Thursday 31 December 2015

उघड्या डोळ्यांसमोर...


उघड्या डोळ्यांसमोर
पसरलाय क्षितिजापर्यंत
जगण्याचा बेहिशोबी तपशील...

चिवचिवतोय
आपापल्या पट्टीत
भाषेच्या आरोह-अवरोहात
कोंबून सगळे स्वर
सगळी व्यंजनं-

लुकलुकतोय
अमाप आकारांमधे
अनाम रंगांमधे
अवकाशातली
आपापली जागा अडवत-

काळाचं बोट धरून
गतीचं आपापलं परिमाण पकडत
अखंड सरकतोय माझ्यासह
जगण्याचा बेहिशोबी तपशील
उघड्या डोळ्यांसमोर..!
***

Wednesday 30 December 2015

तसं उगवता येईल मग...


प्रत्येक सूर्यास्तानंतरच्या
पहिल्या प्रहरात
विसर्जीत करता येईल का
प्रत्येक दिवसाचा जन्म
संपूर्ण कोलाहलासह..?

वसंतऋतूच्या प्रत्येक पहाटे
जन्मतो नवा बहर
त्याच वृक्षावर
तसं उगवता येईल मग
ताजेपणानं
आपल्याच जुन्या बुंध्यातून
उत्तर-रात्रीच्या शेवटच्या प्रहरात
प्रत्येक सूर्योदयाबरोबर..!
***

Tuesday 22 December 2015

निमूट धारण करत राहते


फुलांचा हार
निसरडी फरशी
काढून ठेवलेल्या चपला.. बूट
मुळारंभापासून दुरावलेले स्वर
पोक काढून पुटपुटत बसलेले,
मान झुकवून हात एकसारखे छातीशी नेत     
गरागरा प्रदक्षिणा घालणारे
स्वतःपासून विभक्त झालेले भक्त...
सळसळणारा पिंपळ
गोंगाट करणारी लेकरं कुणाकुणाची
भरधाव ट्रॅफिक आणि
प्रदूषण सर्व प्रकारचं...

कोर्‍या अवकाशाला
इथे-आत्ताचे असे असंख्य तडे...
अनावर आक्रमणं सतत चहुकडून
इतिहास-भुगोलाकडून
अनंत वाटा.. क्षितिज.. आकाशगंगांकडून
भाषेकडून... उद्दीपीत भावनांकडून
पर्वत-शिखरं.. दर्‍या.. समुद्रांकडून
आणि ये-जा करणार्‍या संपूर्ण जीव-सृष्टीकडून
तरी
एखादे उत्कट लॅंडस्केप आपल्यावर उमटू देणार्‍या
तटस्थ कॅनव्हाससारखे
चौकट नसलेले असीम अवकाश
निमूट धारण करत राहते
यच्चयावत् आवक-जावक..!
***

की तडजोड..?


जे जमिनीच्या वर दिसतं
बहरतं... पानगळ भोगतं..
पुन्हा बहरतं..
फिरत राहतं ऋतुचक्रामधे
ते झाड..
ही सरळ समजूत
आता तपासून पाहायला झालीय
त्रिमितींमधे काळाची चौथी मिती
जमा झालीय केव्हाच
हळूहळू नव्या मिती
नावं माहीत नाहीत अशा
बदलवून टाकतायत
सगळ्या गणितांची सूत्रं आणि
सुसंगतीविषयीच्या
अंगवळणी पडलेल्या कल्पना..!
निराधार होतायत जगण्याचे रूढ आधार
मेंदुतल्या पेशी गोंधळतायत.. थकतायत
पाहतांना भेसळ फुलांच्या रंगांमधली
ऋतुंमधली... भाषांमधली
इझम्सच्या अनुसरणांमधली
संस्कृतींमधली.. कार्यक्षेत्रांमधली
संकल्पनांमधली...
हे अटळ परिवर्तन की निव्वळ तडजोड
अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली?
कुठे घेऊन चाललाय
हा नव्या युगाच्या अनाकलनीयतेचा झंझावात?
***

Sunday 20 December 2015

पाऊस असा यावा की



पाऊस असा यावा की
मनमेघ मोकळा व्हावा
अन विजा काडाडुन जाता
धगधगता ऊर निवावा

पाऊस असा यावा की
मनभुई चिंब निथळावी
वार्‍याच्या पदरामधुनी
बीजांची माळ गळावी

पाऊस असा यावा की
मनबीज तरारुन यावे
कोवळ्या उन्हाच्या प्रहरी
हलकेच फूल उमलावे

पाऊस असा यावा की
मनमोर नाचरा व्हावा
हिरमुसल्या आकाशाला
नीलिमा पुन्हा गवसावा..!
***

Friday 18 December 2015

कुठून तरी कुठे तरी



कुठून तरी कुठे तरी एकसारखी
निमूट धावतेय मुंबईतली गर्दी...
केव्हाही काहीही होईल
अशी मनाची तयारी असलेली
स्वस्थता आहे तिच्या गतीला
एक लय आहे आनाकलनीय झिंग असलेली
प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच
वापरून वापरून
जुनं मोडकळीला आल्यासारखं
तरी मेकअप करून चालू पडलेलं...

जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज
राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची
कुठेही कशीही सांडलेली.. वाहणारी त्यांची जनता..
तिनं काय करावं या चेहर्‍यांचं?
त्यांनी काय करावं
या बेढब वाढलेल्या जनतेचं?

प्रत्येक प्रश्नापुढे हतबलतेचा पूर्णविराम !
अशा जगण्याची लाज वाटायलाही
उसंत नाही कोणाला !
माहीत नसलेली वेळ फीड केलेल्या
टाईमबॉम्बसच्या रस्त्यावरून
धावतायत सगळी...
त्याची टिक टिक ऐकू येऊ नये म्हणून
ढोल वाजवतायत जीव खाऊन
फटाक्यांच्या माळा फोडतायत
लाऊडस्पीकर्सच्या भिंती उभ्या करून
बेसूर गाणी आदळवतायत
केविलवाण्या छात्यांवर
कुणाला काही दिसू नये
म्हणून रोषणाई करतायत जागोजाग
बधीर होत चाललेल्या मनांवर
प्रदूषणांचा वज्रलेप लावतायत..!

क्षितिजाला तडा जाईल
असा आक्रोश करावा म्हणून
बेंबीच्या देठापासून उसळलेला आवेश ओसरतोय
कपाळावर आठी उमटवून जेमतेम
अशा आठ्यांचे खांब दुभंगून
कधी प्रकटतील माणसामाणसातले नरसींह?
***

Thursday 17 December 2015

स्वप्नसमाधी


झाडांच्या बुंध्यात... फांद्यात..
टांगलेले असतात झोके
जागोजाग...
पुरेशा अवकाशाची
वाट पाहत असतात
गाढ मौनात !

अचानक घालू नका घाव
बुंध्यांवर.. फांद्यांवर
आतल्या झोक्यांवर
झुलत असतील स्वप्नं
रस रंग गंधाची...
दंग असतील स्वतःत
अनिमिष !
उद्‍ध्वस्त करू नका
ती स्वप्नसमाधी..!
***

Wednesday 16 December 2015

पुन्हा पुन्हा



पुन्हा पुन्हा
अळी होतं तन.. मन
वळवळत राहतं
आपल्या कोषात
घुसमट अनावर होण्याच्या क्षणाची
वाट पाहत !

तो क्षण आला की
निकरानं भिडते अळी
आपल्या कोषाला
तो फाडून काढण्याच्या झटापटीचे
होतात पंख
आणि
पुन्हा फुलपाखरू होतं तन.. मन
अळीचे पुनर्मृत्यु
फुलपाखराचे पुनर्जन्म...
एक ऋतुचक्र
फिरत असतं आतल्या आत
आव्याहत...!
***

Tuesday 15 December 2015

परंतू



चांदणी दिसता अचानक
वेदनेचे फूल होते
गाढ अंधारात निजल्या
अक्षरांना जाग येते

वाटते होईल गाणे
धुमसणार्‍या संभ्रमांचे
वाटते येईल हाती
ताट भरले उत्तरांचे

दुमडलेले प्रश्न सारे
वाट होउन साद देती
हात सुटता जीवनाचा
येउनी हातात देती

चांदणी विझते परंतू
रोजच्या सूर्योदयाला
विकलतेचे ऊन पुन्हा
परतुनी येते घराला !
***

Monday 14 December 2015

तो देखणा भारव्दाज..


तुम्ही या छायाचित्रातल्या
खराटा झालेल्या वाळक्या झाडाकडे पाहू नका
माहितीय दर पावसाळ्यात
ते न्हाऊन निघतं नखशिखान्त
तरी ते तसंच राहिलंय
जराही न बहरता..

या मधोमध दिसणार्‍या
रिकाम्या दगडाकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय
त्यावर एक देखणा भारव्दाज होता
मागं झाडांच्या रांगा दूरपर्यंत
मधे मधे रिकामं सुटलेलं अवकाश
भोवती भिजलेली हिरवळ.. लाल जमीन..
अलिकडे एक छोटासा धबधबा
खाली जलाशय...
माझ्या बाजूनं हे दृश्य अनुभवता अनुभवता
ते चौकटीत बंदिस्त करायला सरसावले हात
घाईघाईनं टिपलं ते दृश्य...

झाडांच्या रांगा.. सर्वत्र विखुरलेलं अवकाश
हिरवळ.. वाळलेलं झाड.. जलाशय..
जमीन आणि तो दगड..
सगळं टिपलं गेलं
देखणा भारव्दाज तेवढा निसटला चौकटीतून...

पण शब्दांतून शब्दांपलिकडे पाहायची सवय असेल
तर दिसेल तुम्हाला तो देखणा भारव्दाज
त्या दगडाच्या बाजूने जाताना
किंवा झाडांच्या रांगांमधे झेपावताना
किंवा जलाशयात डोकावताना
नक्की दिसेल कुठेतरी...

नजरेनं टिपलेल्या दृश्यातून
अदृश्य नाही होता येणार त्याला...!
***