Monday 25 July 2016

व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

उत्तरार्धानंतरच्या या कविता 
‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’ 
या नावानं संग्रहरूपात प्रकाशित झाल्या आहेत. 
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे. 
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी. 
प्रकाशन तिथी- मे २०१६.


या कविता ब्लॉगवर ओळीनं पोस्ट केल्या आहेत. पण पहिली कविता सर्वात खाली गेलीय आणि शेवटची वर दिसतेय. त्यामुळे संग्रहातील कविताक्रम इथे उलटा वाटेल...


Monday 1 February 2016

शब्द नजर असतात...

शब्द दृश्य असतात
खिडकी असतात
नजर असतात...

प्रसंग, माणसं, घटना,
सुख-दुःख, आनंद, संताप..
सगळं काही
आपापल्या जागी स्थिर असतं.
शब्द त्यांची वर्णनं करतात
आणि देतात त्यांना नवनवे आयाम...

प्रत्येकाच्या नजरेनुसार
बदलतात वर्णनं
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर
बदलतात त्यांचे आशय

भोगणार्याला
फसवे वाटतात शब्द.
दुरून पाहणार्याला
थोर मार्गदर्शक वाटतात...

शब्द स्वतः काहीच नसतात
ते असतात केवळ
एक स्वागतोत्सुक पोकळी..

पाण्यासारखे
ते धारण करतात
द्याल तो रंग.. आकार
द्याल तो स्वाद.. गंध

बिंब म्हणून वाट्याला येईल ते
स्वीकारतात शब्द
आणि पाठीशी घालतात
सगळं जसंच्या तसं
स्वतः राहतात नितळ
आरशासारखे
आणि पाहणार्‍याला दाखवतात
निखळ त्याचं रूप

फक्त बाहेरचं नाही
आतलंही उलगडून ठेवतात समोर..!

***

शब्द एकाच वेळी

शब्द एकाच वेळी
सूर्य होऊन
उगवतात पूर्वेला
आणि
चंद्र होऊन
पश्चिमेला मावळतात

किरणांसारखे
पसरतात सर्वदूर
आणि
भारद्वाजासारखे
नाहीसे होतात
डोळ्यादेखत

निष्पर्ण झाडासारखे
एका बाजूला उभे राहतात
जन्मदात्या भुईच्या तुकड्यावर
पाय रोवून
आणि दुसर्‍या बाजूला
अनावर सळसळत राहतात
पुराण्या पिंपळासारखे

शब्द एकाच वेळी
ऊन-सावली
कडू-गोड
गंध-दुर्गंध
रव-निरव
अशा हजारो व्दंव्दांना
जन्माला घालतात
आणि त्यांना ओलांडून
सामावलेले राहतात
निर्व्दंव्दात..!

***

लॅंडस्केप

बाल्कनीत बसून
शब्दांनी एक लॅंडस्केप रंगवलंय..

नजरेला लागून समोरच
फूलं होण्याच्या बेतात असलेल्या
मोगर्‍याच्या कळ्या
बाजूला तुळस गुलाब मदनबाण..

खाली रस्त्यावर
एकीकडे प्राजक्त.. मधुमालतीचा वेल
समोर बहरलेला लालभडक गुलमोहर
आणि
द्वारपालासारखी उभी असलेली
पाम.. अशोकाची झाडं..
जरा पुढं
रिमझिमणारा पिवळाजर्द बहावा
केळ कर्दळ जास्वंद अबोली..
पावसाच्या अचानक सरीनं
ओला झालेला रस्ता..

त्यावर खेळणारी मुलं
फेर्‍या मारणार्‍या स्त्रिया 
येणारी जाणारी वाहनं
भुंकणारी कुत्री इकडे तिकडे
ओळीनं पार्क केलेल्या गाड्या..
रस्त्याच्या दुतर्फा चार मजली इमारती
आतून गजबजलेल्या..

शब्दांनी हुबेहुब रंगवलंय
एका कॉलनीचं चित्र
अगदी जिवंत..!

पण त्यांनी
अनुच्चारित ठेवलेत
घराघरातले वाद-संवाद...
खाली फेर्‍या मारणार्‍या
मनांमधले कल्लोळ
आणि बरंच काही...

दूर समुद्रात चक्रीवादळ झाल्याचा
पावसाच्या सरीचा सांगावा
झाकून टाकला त्यांनी
मावळतीच्या पिवळ्या छटांखाली...
आणि
वरून हुबेहूब रंगवलेल्या
झाडांच्या बुंध्यांमधले
अनोळखी अंधार तर
त्यांना चितारताच आले नाहीत..!
***

तेव्हा शब्द..

आतल्या आत कडेलोट होऊन
अकस्मात हदरू लागते भुई
आणि कुणाला काही उमगायच्या आत
धडाधड कोसळू लागतात
उंचच उंच रंगीबेरंगी इमारती
पाठोपाठ धूळ.. हाहाःकार.. आक्रोश
बघता बघता गाडली जातात
हसती खेळती दृश्यं जमिनीखाली...

तेव्हा शब्द निशःब्द होतात
अवाक्षर उमटत नाही
आकाशाच्या पटलावर..!

सूर्य उगवतो काहीच न घडल्यासारखा
पक्षी किलबिलत विहरू लागतात
केशरी आकाशाखाली
फुलं मुक्त करतात गंध
आपापल्या कोषांमधला..

तेव्हा शब्द तटस्थ उभे राहतात
दृश्याच्या कडेला
दृश्याचा भाग होऊन..!

दोन वृद्ध बोलत असतात
आपल्या वाट्याला आलेल्या भोगांबद्दल
दाखवत असतात एकमेकांना
आपापल्या जखमा
आणि अच्छा म्हणून निघताना
हसतात खळखळून...

तेव्हा शब्द
घुटमळतात तिथं क्षणकाल
आणि फुलपाखरावर स्वार होऊन
निघून जातात नव्या दृश्याकडे..!

***

मनाचं शांतवन होईपर्यंत..!!

मन मोर असतं तेव्हा
नृत्याला पदन्यास शिकवतात
शब्द
स्वरांना ताल देतात
आणि आशयाला लय...

मोराबरोबर
साद घालतात पावसाला
अंगण माखून टाकतात
मृदगंधानं
आणि स्वतः पिसारा बनून
थिरकत राहतात
मनाची तृप्ती होईपर्यंत..!

मात्र रिकाम्या मनात
घालतात धिंगाणा
दणाणून सोडतात
आतलं आकाश
खणत बसतात भूतकाळ
आणि डोकावत राहतात
विवरांमधल्या अंधारात

कडाडतात विजेसारखे
आतल्या आत
नि मग स्वतःच बरसत राहतात
डोळ्यांमधून धुवांधार
मनाचं शांतवन होईपर्यंत..!! 
***

मुखवटे

उद्‍गारांच्या शहाण्या-सुरत्या..
वेड्या-वाकड्या.. श्लील-अश्लील
सर्व लेकरांना
शांत निजवून
रात्रीच्या गडद अंधारात
निवांत झोपायचं असतं शब्दांना

पण तार्‍यांच्या लुकलुक प्रकाशानं
हिंदकळत राहतो अंधार
शब्दांना झोपता येत नाही स्वस्थ...!

ते उघडतात मग बंद स्वगतांची दारं
दशदिशांत कोंदलेली
असंख्य रंग-रूपातली
असंख्य अस्फुटे
घुसतात दारातून आत..

आकाशातल्या गडद शांततेहून
अधिक कर्कश
भूगर्भातल्या लाव्ह्याहून
अधिक तप्त स्वरात चित्कारतात ती
मोकळं करतात अंतरंग..
ज्वालामुखीत वितळून जातात
झाकापाक करणारे मुखवटे..

आतले निर्भय राहू पाहणारे चेहरे
दीर्घ मोकळा श्वास घेतात..!

पण पुरती पहाट व्हायच्या आतच
सुरू होते पक्षांची किलबिल,
कुहुकुहुची जुगलबंदी..
झोपू न शकलेल्या शब्दांना
जाग येते लगेच
तारवटलेल्या डोळ्यांनी
घाईघाईत ते शोधू लागतात
नवे मुखवटे..!

भू-गोलाच्या परीघावरच्या
कोणत्याही नव्या दिवसाला
सामोरं जाता येत नाही त्यांना
आपल्या अनावृत्त सत् रूपात..!

***

की..?

आयुष्य
इतकं घृणास्पद
इतकं वेदनामय
इतकं नगण्य आणि
बेभरवशाचं...
तरी
कोणत्या अनाकलनीय उमेदीनं
रांगा लावतात
डॉक्टरांच्या दारात
हाताच्या शिरेत सुई टोचून ठेवलेले
नाकात नळ्या घातलेले
कमरेला.. छातीला पट्टा बांधलेले
व्हील चेअरवर असलेले
असंख्य रुग्ण?

मनात एकीकडे
वाट पाहत असतात सुटकेची
आणि चाहुल लागताच
धाव घेतात डॉक्टरांकडे..!

जन्मक्षणापासून सोबत आलेल्या
जुनुकातल्या प्रोग्रामिंगचे
दिग्ददर्शन असते ते, की
‘जिजीविषेत शतं समाः’चे प्रतिध्वनी
वर्धिष्णू ठेवत असतात

जगण्याची उमेद मनामनात?
***