Sunday 31 January 2016

दंश

पुन्हा पुन्हा
दंश करणारी ही पोकळी
माझ्या विद्ध मनाला
जखडून ठेवतेय
नाहीशा होऊनही
ठसठसत राहिलेल्या वेदनेत !
ओलांडू देत नाहीए
स्वतःचा अनाकलनीय परीघ..

तरी
कुठं काय..? म्हणत
ते निसटू पाहतंय
तिच्या तावडीतून
हरप्रकारे
सोडवू पाहतंय
तिचा विळखा...

खरंतर
तिच्यातच पाय रोवून,
अंतर्बाह्य अनुभवत तिचा ठाव
त्यानं समजून घ्यायला हवंय
की केवळ दुखवणारा, साधासुधा नाही
‘असण्या’च्या प्रचितीचा
दंश आहे तो
बुद्धीच्या कक्षेत न आलेला...
अखेर नश्वर देहानंच देऊ केलाय ते..!

***

नेमून दिल्याप्रमाणे?

उन्हाळे.. पावसाळे
त्यातल्या सर्व चढ-उतारांसकट
भोगून झाल्यावर
उगवत्या दिवसाला सामोरं जावं
तितक्या सहज
दर शिशिरात
निःशंक निर्ममपणे
नखशिखान्त
झडून जातात झाडं...
विसरत नाहीत कधी
गळून पडणार्‍या
प्रत्येक पानाच्या रिक्तपणात कोरलेली
पुन्हा बहरण्याची हमी..!

पण प्रत्येक बहर
पूर्वीपेक्षा काही वेगळी झळाली घेऊन येतो
की केवळ रिक्तपण भरुन काढतो
नेमून दिल्याप्रमाणे?

***

उद्‍भवक्षणापासून

उद्‍भवक्षणापासून
वर्षानुवर्षे
बेलगाम धावतो आहे
हा रथ

क्षणाक्षणाला भर पडत जाणार्‍या
प्रत्येक दिशेगणिक
वाढताहेत...
याला ओढणारे घोडे

वाढते आहे त्याना धाववणारे
मायाजाल..
किती महामानव आले
याला भला मार्ग दाखवत राहिले..

पण
अजूनही
काहीच पादाक्रांत न करता
जिथल्या तिथेच
आदीम अवस्थेत
उभा असलेला रथ पाहून
करूणानिधी
बुद्धानंही आता
या जगाकडे
पाठ फिरवलीय..!

***

शिकलं शरीर आपोआप...

तिनं मानेखालचा हात
अलगद काढून घेतला
थोडा वेळ मान डुगडुगली
पण बाहेरचा आधार नाहीसा झाल्याचं कळताच
मानेचे स्नायू सावध होत
ताठ झाले..

मग तिनं पाठीवर थोपटणारा हात
दुसर्‍या कामात गुंतवला
तशी पाठीच्या कण्यात
धावपळ सुरू झाली
थोपटण्यावर विसावलेल्या पेशी
खडबडून जाग्या झाल्या
कणा स्वावलंबी व्हायला सरसावला..

मग तिच्या मानेभोवती
मिठी घातलेल्या हातांची पाळी आली.
तेव्हा तिनं नवीच युक्ती योजली..
तिनं टाळ्या वाजवायला शिकवलं
मानेभोवतीचे हात हसत हसत खाली आले
टाळ्या वाजवता वाजवता
घट्टमुट्ट होत गेले
खाली झेपावू लागले..

मग तिनं एक दिवस
खुशाल खाली उतरवलं
दोन पायांवर शरीर तोलताना
बुदुक्‍कन पडायला झालं
बघणारी हसत होती...
पायांच्या बोटांमधे
जमिनीचा आधार पकडण्याचा
निकराचा प्रयत्न
जमिनीनंही उधळून लावला
तशी बोटं ताठ झाली
आणि पावलांना समजलं
अरे, जमीनीचा आधार आहे की खाली!

बाहेर थोपटणारा हात नसला की
आतल्या पेशीपेशीतून गोळा होतो धीर
स्वतःला ताठ उभं करण्याचा
हे शिकलं शरीर आपोआप
तिनं न शिकवता..!

***

लिव्हिंग विल

कुणाकुणाच्या नादी लागून
मी लिव्हिंग विल लिहायला घेतलं
तर माझ्यातल्या पत्नीचा हात
पतीच्या हातात बांधलेला
माझ्यातली बहीण
भावा-बहिणींना हवी असलेली
माझ्यातली मावशी, आत्या
भाचरांच्या प्रेमात गुरफटलेली
माझ्यातल्या भाचीवर
मामाचा जीव
आणि माझ्यातली मुलगी तर
आईनं अजून कवटाळून ठेवलेली..
माझ्यातली मैत्रिण.. शेजारीण..
असंख्य नात्यांत मी विखरुन गेलेली..

कुणाकुणाच्या नादी लागून
मी लिव्हिंग विल लिहायला घेतलं
तर शब्द अडखळले असे
प्रत्येक नात्याच्या उंबर्‍याशी

मग राखून ठेवला
सगळ्या नात्यांच्या वाटचा अधिकार
आणि सरसावले पुन्हा
तर माझ्यातल्या कवयित्रीनं विचारलं
विल कशाचं करणार
देहाचं.. मनाचं.. की बुद्धीचं..?
यातलं काय कमावलंयस तू स्वतः?
लिव्हिंग विल करायला
तुझं असं आहेच काय इथं?

***

Saturday 30 January 2016

माझं वय

आईनं सांगितलेल्या
माझ्या जन्मतारखेनुसार
माझं वय त्रेसष्ठ आहे.
पण त्यांना माझ्या आईचं सांगणं
मान्य नाही.
ते फक्त स्कूल लीव्हिंगचा कागद मानतात.
त्यानुसार माझं वय चौसष्ठ आहे.

एका वर्षानं काय फरक पडतो?
म्हणून त्यांच्यापुढे नमतं घेऊन
माझं वाढतं वय मी स्वीकारून टाकलं..
तर आता प्रत्येक डॉक्टर
माझं वेगवेगळं वय सांगताहेत.
तेही एकसंध नाही
एकजण फक्त हाडांचं वय सांगतो
दुसरा लिव्हरचं.. तिसरा फुफ्फुसांचं..
त्यांना स्कूल लीव्हिंगचा कागद मान्य नाही
ते यंत्राची स्पंदनं मानतात.

काल त्यांनी मला
जोरात फुंकर मारायला सांगितली.
मी मारली
अजून.. जास्तीत जास्त.. अशी- सर्व बळ एकवटून..
मी पुन्हा फुंकर मारली
त्यांनी स्क्रीनवर पाहिलं
एक.. दोन ..तीन वेळा काळजीपूर्वक तपासून
त्यांनी प्रिंटाउट काढला
त्यातली आकडेवारी समजावून सांगत
त्यांनी मला पटवून दिलं की
माझ्या फुफ्फुसांचं वय सत्त्याणौ आहे...
ताठ मानेनं आत गेलेली मी
वाकत थरथरत बाहेर पडले...

मनात आलं, असं कसं झालं?
आता तर नव्यानं तरूण झाल्याच्या आनंदात होते मी
माझे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले म्हणून
असं कसं अचानक वाढलं वय..?

अर्थपूर्ण शब्द शोधण्याच्या नादात
मी भरभरून श्वास घ्यायला
आणि मोकळेपणानं सोडायला
विसरत होते की काय?
इतक्या वर्षांच्या अवधीत
मला साधी फुंकर मारता येऊ नये?

तरी पूर्वसूरी बजावत होते
शब्द बापुडे केवळ वारा..!
तो मी भरभरून आत घ्यायला हवा होता
आणि निःसंगपणे सोडून द्यायला हवा होता..
‘..निज शैशवास जपणे..
मग जमलं असतं कदाचित..!
***   

कुठे आहे?

कुठे आहे
केव्हापासून होऊ लागलंय म्हणतात
ते सांस्कृतिक सपाटीकरण?

कितीतरी शे वर्षांपासूनच्या परंपरेनुसार
ग्लोबलायझेशनच्या अनावर झंझावातातही
दणकून पेटताहेत होळ्या
गल्लोगल्ली... कॉलनी कॉलनीत..

प्रत्येक चॅनलवर
प्रत्येक मालिकेत
नखशिखांत नटून
साजरी होतेय होळी
उधळतायत रंग
उन्मादक जल्लोषात

होळीचा मूळ हेतू की काय ते
वैधानिक सूचनेसारखं
न चुकता सांगून
पर्यावरणाचं भान असल्याचं दाखवत..

गोवर्‍याबिवर्‍या.. रंगाबिंगांचं मार्केट
तेजीत आहे भलतच
बतम्यांमधूनही ऐकू येतायत
गवोगावच्या.. महानरांमधल्या
होळ्यांची.. रंगांची
रसभरीत वर्णनं

रंगांनी माखलेल्या
ओळखू न येणार्‍या चेहर्‍यांच्या यूथचे
फोटो झळकतायत
वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांवर
शुभेच्छा दिल्या जातायत
एसेमेस, फेसबुक, ट्विटरबिटरवरून...
जरा जरा पटू लागलेली
तिथ्यामिथ्यांची कालबाह्यताच
कालबह्य करून टाकतायत...

खुली बाजारपेठ आणि
लाचार राजकारण
हातात हात घालून
नांदता ठेवतायत
सर्व उत्सवांचा उन्माद
सोशल नेटवर्किंगच्या
आदि अंत दिसत नसलेल्या अवकाशात
पसरतायत सगळ्या संस्कृती ऐसपैस
कुठून कुठून कुठे कुठे..

उदारीकरण
बनवतंय संस्कृतींची चटकदार भेळ
परोपरीनं मोह घालतंय
ग्लोबल व्हिलेजच्या रहिवाशांना
म्हणतंय आपल्या दमदार आवाजात-
नमश्कार.. आदाब.. सत् श्री आकाल..
हॅव अ नाईस डे.. इ.इ...
हेच का ते सांस्कृतिक सपाटीकरण?

***

भयानक गर्दी

भयानक गर्दी
अनावर मुबलकतेची
असंख्य अभावाना चिरडून सुसाट धावणारी

अंधारी आणणारा लखलखाट
चंद्र चांदण्या झाकोळणारा

भोवती गदारोळ
माणसांचा.. वाहनांचा..
भाषेचा.. भावनांचा..
मृत्युंचा.. जन्मांचा..

हलकल्लोळांचा उजेड
इतका प्रखर इतका प्रखर
की काही दिसेचना.. ऐकू येईना..
कळेना.. जाणवेना..
सुन्न हातात कोरा कॅनव्हास
आणि ब्रश बधीरतेत बुडवलेला...!

***

अंधार विझत जातो

अंधार विझत जातो
दिवे डोळे मिटून घेतात
एकेक क्षितिज ओलांडत
पृथ्वीवर उतरतात सूर्यकिरण
झाडं पुन्हा हिरवी दिसू लागतात
पक्षी घरट्यातून आकाशात झेपावतात

दिवस खडबडून जागा होतो
त्याला धडकी भरते
आज काय काय बघावं लागणार?
काय काय ऐकू येणार?
किती चिरडले कापले छाटले जाणार
किती मरणार तगणार हाय खाणार
किती होणार हल्ले प्रतिहल्ले
किती होणार खून आत्महत्या

कसं केव्हा कुठं काय काय घडणार विपरित
आणि सर्व मृत्युंचा पराभव करत
किती जन्मणार नव्याने?
काय काय लिहिलं जाणार
‘आज’च्या तारखेला?

***