Monday, 1 February 2016

की..?

आयुष्य
इतकं घृणास्पद
इतकं वेदनामय
इतकं नगण्य आणि
बेभरवशाचं...
तरी
कोणत्या अनाकलनीय उमेदीनं
रांगा लावतात
डॉक्टरांच्या दारात
हाताच्या शिरेत सुई टोचून ठेवलेले
नाकात नळ्या घातलेले
कमरेला.. छातीला पट्टा बांधलेले
व्हील चेअरवर असलेले
असंख्य रुग्ण?

मनात एकीकडे
वाट पाहत असतात सुटकेची
आणि चाहुल लागताच
धाव घेतात डॉक्टरांकडे..!

जन्मक्षणापासून सोबत आलेल्या
जुनुकातल्या प्रोग्रामिंगचे
दिग्ददर्शन असते ते, की
‘जिजीविषेत शतं समाः’चे प्रतिध्वनी
वर्धिष्णू ठेवत असतात

जगण्याची उमेद मनामनात?
***

निरोप..

कुणी कितीही नगण्य असो
प्रत्येकाला
कुणी न कुणी
कसले न कसले
निरोप पाठवत असतं
अव्याहत
कुणाकुणासाठी तरी

पाची संवेदनाच्या दारात
छुमछुमत असतात घुंगरू
संकेत देत असतात
निरोप आल्याचा

काल विचारलंस ना
कोणती कृती करू मी
की सार्थक होईल असण्याचं
जाता येईल काही मागं ठेवून..

फार काही नाही
फक्त वेचत राहा निरोप
दारात येऊन पडणारे
ताजे असतानाच
आणि पोचव ज्याचे त्याला
वेळेवर..

राहू देऊ नकोस एकही
वेचायचा... पोचवायचा...
मग जाताना
राहील मागे समाधान
की मी मला जगवणार्‍या
संवेदनांशी इमान राखलं..!

*** 

थोडं ऊन उधार हवंय मला..

थोडं ऊन
उधार हवंय मला

एकीकडं हवाहवासा
गदगद व्याकुळ एकटेपणा
आणि
दुसरीकडं कानांवर आदळून
तो विस्कटणारी
उन्मादक आतषबाजी..!

तिच्या जल्लोषात..
झगमगाटामागे
दिसतोय मला
तहानलेला रिक्त अंधार

मला घडवायचंय
एक अपूर्व शिल्प
स्वतःला समोर बसवून

मी गोळा करतेय
हलकल्लोळांच्या छिन्न्या
पण
काहीच दिसत नाहीए
जाणिवेच्या नजरेला...

आतषबाजीच्या खालचा
रिकामा अंधार गिळतोय सगळं
की गोठून गेलीय नजर?

थोडं ऊन
उधार मिळालं तर
वितळेल नजरेचं गोठलेपण
आणि कदाचित
मावळेल अंधार पण
दिसू लागेन मी मला समोर
विखुरलेल्या छिन्न्यांच्या मधोमध..!

मी केव्हाची वाट पाहतेय उन्हाची...

***

एक दर्शनबिंदू होतीस तू

आई,
१९२६ ते २०१५
या दीर्घ कालखंडाकडे पाहणारा
असंख्यांमधला एक दर्शनबिंदू होतीस तू

तू नव्हतीस कुणी सिद्धहस्त लेखिका
पण तू पाहिल्यास
प्रत्यक्ष अनुभवल्यास
कितीतरी वास्तव कथा
जगलीस त्रिखंडात्मक कादंबरी..!

सहनशीलतेच्या कवच्यात दबले गेलेले
कितीतरी आक्रोश.. आकांत
शारिरिक मानसिक अपमान.. फरपट
कडेलोटाच्या प्रसंगांमधली हतबलता
आणि माझ्या आकलनाबाहेरचं काय काय..
शब्दबद्ध झालं नाही कधीच..

बुडू न देता
तू वल्हवत राहिलीस आपली नाव
प्रवाहाशी इमान राखत..

‘कुर्वन् एव इह कर्माणि जिजीविषेत शतं समाः’
हे शिकली नव्हतीस तू कधी
असं कुणी लिहून ठेवल्याचं
तुझ्या कानावरही आलं नसेल कदाचित
पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष जगलीस तू आई
‘कर्म माणसाला बांधत नाही’
याची तुला पर्वाही नसेल
पण ‘या शिवाय दुसरा मार्ग नाही’
यातली अपरिहार्यता तर तू
भोगलीस आणि निभावलीसही..!

परीकथेतल्यासारखं
सात समुद्र.. सात अरण्य.. सात बोगदे..
पार केल्यावर मिळणार्‍या
भरजरी सुखासाठी म्हणून नाही
पण तू पार केलेस
तसले दुर्गम काळाचे टप्पे
आणि भोगलंस मिळालं ते सुख
भरजरी म्हणून मिरवत..!

जगण्यावरची ही अपार निष्ठा
जगण्यातली असोशी
बोगद्यांपलिकडे उजेड असेलच
हे माहीत नसतानाही
ते ओलांडण्यासाठी
चालत राहण्यातली ऊर्जा
हे सगळं
कुठून मिळवलंस आई?
विचारायचं राहून गेलं..!

***

जन्माचा क्षण तरी

जन्माचा क्षण तरी
कुठं ठरवता येतो ?

आतल्या आत
पूर्ण वाढ झाल्यावर
परीपूर्ण इवला देह बाहेर पडतो
आतल्या अंधारातून
या जगातल्या उजेडात
तेव्हा आपण म्हणतो
जन्म झाला..!

पण त्या आधीच केव्हातरी
कुठून तरी सुरू झालेला असतो प्रवास..
प्रगत शरीरशास्त्र
देतं साद्यंत सचित्र तपशिल
जिवाच्या दिसा-मासांनी, कणाकणांनी
वाढत, घडत जाण्याच्या प्रक्रियेचा..

यातल्या कोणत्या टप्प्यावरचा
कोणता क्षण जन्म-क्षण असतो?
प्रारंभाचा एक पेशी रूप बहाल करणारा?
की नऊ महिने नऊ दिवसांनी
या जगात आणणारा?

वाढणारं वय.. उंची
बदलत जाणारं रूप..
जगण्याचा स्तर.. नवी नाती
माणूस म्हणून घडत राहण्याच्या
या प्रक्रियेतला प्रत्येक क्षण
देऊ करत असतो नवी ओळख
हे सगळे नवे जन्मच तर असतात..!

बदलत असतात सतत
माणूस असण्याचे आयाम
भोवतीच्या पर्यावरणातील
दरेक बदलाबरोबर..
प्रत्येक नवा बदल
हाही नवा जन्मच असतो ना..!

हे सर्व आपण प्रत्यक्ष अनुभवतो
जन्म ओळखीचा वाटतो
कारण त्या सोबत मिळते
पंचेंद्रियांची अनुभव-क्षमता
आणि जाणीव
सगळं आपल्या समोर असतं..

हे मिळण्यापूर्वीचा अंधार
गूढ नाही वाटत
पण ते गमावल्यानंतरचा
मृत्युनंतरचा अंधार
गूढ.. अनाकलनीय.. आणि
घाबरवणारा वाटतो..

आपल्या असण्याच्या भोवतीचा
या दोन अंधारांच्या मधला
आयुष्य नावाचा उजेड
असतो मध्यसीमेसारखा..
एका अंधारातून
दुसर्‍या अंधारात जाताना
वाट दाखवणारा..!
***   

मृत्यु काय फक्त पार्थीवच असतो?

मृत्यु काय फक्त पार्थीवच असतो?
जगण्याच्या चक्रात फिरताना
कितिदा भोवळ येते
ती फक्त देहाला नाही..

कित्येक अपेक्षाभंग
अपमान
पराभव
आपल्याच नजरेतून उतरावं लागणं
निराशा...
दुःख.. हतबलता..
ही सगळी मृत्युचीच रूपं..

पार्थिवाच्या कुशितले
असे मानसिक आणि
आध्यात्मिक मृत्यु अनुभवता येतात
आणि त्यांच्या पाठोपाठ
लाभतात नवे जन्म नवी ओळख देणारे..

उन्नत करणारे असतात
हे मृत्यु..जन्माचे फेरे..! 
नश्वर देहाच्या सोबतीनंच
अनुभवता येतात ते..!

***

तसा तर जन्मापासूनच

तसा तर जन्मापासूनच
सुरू झालेला असतो परतीचा प्रवास
आपल्याला वाटतं
आपण वाढतोय..

वाढदिवस साजरे होतात
पण माहीत नसलेल्या
आयुष्याच्या आकड्यातून
वजा होत असतं एकेक वर्ष..
पुढं पडतंयसं वाटणारं प्रत्येक पाऊल
खरंतर त्याच्याकडंच नेत असतं..

त्वचेनं झाकलेल्या देहाच्या
आत अखंड चालू असतो
उत्पत्ती-स्थिती-लयाचा खेळ
एकेक पेशी जन्मते
एकेक मरत जाते
आतल्या आत भोगत असतं शरीर
सततचे हे जन्म-मृत्यु..

कितीतरी अत्याचार.. घुसखोरी
वेगवेगळ्या इंद्रियांमधले वेगवेगळे संघर्ष
आणि गलितगात्र होतं तेव्हा
पराभूत पेशीसारखं मृत्युच्या स्वधीन होतं

आपण म्हणजे जणू
विश्वाच्या देहातल्या असंख्य पेशींपैकी

एक पेशी असतो..! 
***