बाल्कनीत बसून
शब्दांनी एक लॅंडस्केप
रंगवलंय..
नजरेला लागून समोरच
फूलं होण्याच्या बेतात
असलेल्या
मोगर्याच्या कळ्या
बाजूला तुळस गुलाब मदनबाण..
खाली रस्त्यावर
एकीकडे प्राजक्त..
मधुमालतीचा वेल
समोर बहरलेला लालभडक
गुलमोहर
आणि
द्वारपालासारखी उभी असलेली
पाम.. अशोकाची झाडं..
जरा पुढं
रिमझिमणारा पिवळाजर्द बहावा
केळ कर्दळ जास्वंद अबोली..
पावसाच्या अचानक सरीनं
ओला झालेला रस्ता..
त्यावर खेळणारी मुलं
फेर्या मारणार्या
स्त्रिया
येणारी जाणारी वाहनं
भुंकणारी कुत्री इकडे तिकडे
ओळीनं पार्क केलेल्या
गाड्या..
रस्त्याच्या दुतर्फा चार
मजली इमारती
आतून गजबजलेल्या..
शब्दांनी हुबेहुब रंगवलंय
एका कॉलनीचं चित्र
अगदी जिवंत..!
पण त्यांनी
अनुच्चारित ठेवलेत
घराघरातले वाद-संवाद...
खाली फेर्या मारणार्या
मनांमधले कल्लोळ
आणि बरंच काही...
दूर समुद्रात चक्रीवादळ
झाल्याचा
पावसाच्या सरीचा सांगावा
झाकून टाकला त्यांनी
मावळतीच्या पिवळ्या छटांखाली...
आणि
वरून हुबेहूब रंगवलेल्या
झाडांच्या बुंध्यांमधले
अनोळखी अंधार तर
त्यांना चितारताच आले
नाहीत..!
***