आतल्या आत कडेलोट होऊन
अकस्मात हदरू लागते भुई
आणि कुणाला काही उमगायच्या
आत
धडाधड कोसळू लागतात
उंचच उंच रंगीबेरंगी इमारती
पाठोपाठ धूळ.. हाहाःकार..
आक्रोश
बघता बघता गाडली जातात
हसती खेळती दृश्यं
जमिनीखाली...
तेव्हा शब्द निशःब्द होतात
अवाक्षर उमटत नाही
आकाशाच्या पटलावर..!
सूर्य उगवतो काहीच न
घडल्यासारखा
पक्षी किलबिलत विहरू लागतात
केशरी आकाशाखाली
फुलं मुक्त करतात गंध
आपापल्या कोषांमधला..
तेव्हा शब्द तटस्थ उभे
राहतात
दृश्याच्या कडेला
दृश्याचा भाग होऊन..!
दोन वृद्ध बोलत असतात
आपल्या वाट्याला आलेल्या
भोगांबद्दल
दाखवत असतात एकमेकांना
आपापल्या जखमा
आणि अच्छा म्हणून निघताना
हसतात खळखळून...
तेव्हा शब्द
घुटमळतात तिथं क्षणकाल
आणि फुलपाखरावर स्वार होऊन
निघून जातात नव्या
दृश्याकडे..!
***
No comments:
Post a Comment