Monday, 11 January 2016

तापलेल्या वाळूतुन

तापलेल्या वाळुतून
ते न अनवाणी गेले
मृगजळाला भाळून
त्याच्या मागे ना धावले

चक्रवाक व्हावे असे
त्याना वाटलेही नाही
त्याच्या वियोगाची जात
त्यांनी ओळखली नाही

कुणी नाहीच म्हणून
साद घालणे टाळले
देवाच्याही मूर्तीकडे
शिल्प म्हणून पाहिले

अभावात भाव कधी
पाहताच आला नाही
शून्य निरसून जावे
असा लाहो केला नाही..!

***

Sunday, 10 January 2016

अधांतरी आकांत

अरण्यातली
रात्र दिशाहिन
तशात
भणभण वारा
अंधाराची
सोबत बहिरी
तुफान
पाऊसधारा !

अंधच सारी
झाडे झुडुपे
मुकी
पशू, पाखरे
ऊग्र भयाची
दहशत भिजकी
मिणमिण
उदास तारे !

तरी चालणे
भागच पडते
पाय
रुते खोलात
आधाराला
नभ ना भूमी
अधांतरी
आकांत !

***

Saturday, 9 January 2016

प्रत्येक झाडाची...


प्रत्येक झाडाची
स्वतःची
एकेक अदृश्य विहिर

विहिर
जितकी खोल
तेवढं उंच
झाड!

प्रत्येकाची
स्वतःची
एकेक अंधारवाट

अंधार
जेवढा गहन
तेवढा नजिक
सूर्योदय..!

***

Friday, 8 January 2016

केव्हापासून...


केव्हापासून माहीत नाही
एक ग्रँड रिअ‍ॅलिट शो
चालू आहे...
विनावाहक विनाथांबा
गाडीसारखा
विनाअँकर विनाथांबा
चालू आहे हा शो..!

वर्तुळाकार क्षितिजानं आखलेला
विराट रंगमंच
सप्तरंगी भव्य सजावट
दर क्षणी बदलणारी
उघडमीट रोषणाई
सूर्य-चंद्राची... सत्तावीस नक्षत्रांची..
आणि अगणित स्पर्धक
सर्व भाषांतले.. सर्व देशांतले..

तरूण.. लिट्‍ल चॅम्प्स..
फॉर्टी प्लस.. सिक्स्टी प्लस.. एटी प्लस..
रोज एलिमिनेट होतायत कितीतरी
कितीतरी जॉईन होतायत नव्यानं
‘वाइल्ड कार्ड’विना

तेच होतात प्रेक्षक
तेच होतात परिक्षक
आलटून पालटून
तेच होतात गुरू एकमेकांचे...

24x7 अखंड चालू आहे हा शो
प्रत्येक चॅनलवर...
वेगवेगळ्या कॅमेर्‍यांनी टिपलेला

केव्हापासून
रिमोट शोधतायत सगळी

ग्रँड फिनालेची तारीख जवळ येत चाललीय..!
***

Thursday, 7 January 2016

नव्या दर्शनासठी

न कुठली तपश्चर्या
न पुण्याई पाठीशी
तरी आम्हाला दूरदर्शन घडते
संजयासारखे!

एकाच नाही
अनेक रणभूमींवरची
अनेक प्रकारची युद्धं
एकदाच नाही
पुन्हा पुन्हा पाहतो आम्ही

फक्त पाहत नाही
ऐकतोही
साफ पचवतोही

आणि
कालचं सगळं विसरून
प्रत्येक सूर्योदयानंतर
ताजेतवाने होऊन
सज्ज होतो
नव्या दर्शनासाठी..!

***

Wednesday, 6 January 2016

पण इथे...


बेमानी ठरतील इथल्या समस्यांचे पीळ
इथल्या आकांतांच्या जाहिराती
खर्‍या-खोट्या दहशती
विझलेल्या अश्रूंचं दुःख
इथल्या फुगत चाललेल्या समृद्धीचा चक्रव्युह

बेमानी ठरतील इथले आनंद
इथले उत्सव... श्रद्धा..
इथली मूल्ये.. भाषा..

बेमानी ठरेल
इथलं संपूर्ण अस्तित्वच
शेजारच्या आकाशगंगेमधल्या
दुसर्‍या एखाद्या पृथ्वीवर

पण या पृथ्वीवर, इथे, आत्ता
अस्वस्थ अस्वस्थ करेल मला
माझं दुखणारं क्षुल्लक नखही!

***

Tuesday, 5 January 2016

कुठे कळते त्याना तरी...


हे अगदिच खरं आहे
की कळत नाही मला
विश्वाचा विराट विस्तार
समुद्राची अथांग गाज
अणूगर्भातलं सूक्ष्मतम रहस्य
किंवा सूर्याच्या गाभार्‍यातली आग...

पण त्यांना तरी
कुठं कळतं
माझ्या मनाचं
दशदिशा घरंगळत राहणं
आणि रोज पराभूत होऊन परतणं?

माझ्या पेशींच्या
अनिश्चित वर्तनाचं गूढ
किंवा आतल्या नसांमधे
निमुट पसरलेल्या वेदनेची धग
कुठे कळते त्याना तरी?...

***