Monday, 1 February 2016

म्हणतात

म्हणतात
माणूस रिकामाच येतो
आणि
जातानाही रिकामाच जातो
स्वतःचा देहही इथेच ठेवून..

पण खरं नाहीए ते आई
तू कुठं एकटी गेलीस?
अनेक नात्यांशी बांधलेली होतीस तू
त्या नात्यांसोबतचे
नितांत वैयक्तिक तपशिल
गेलेच ना तुझ्याबरोबर..

आमच्या ओठा-पोटातली
आई ही हाक
आम्हाला न्हाऊ-माखू.. जेऊ-खाऊ घातलेल्या
हातांचे स्पर्श..
आमच्या भोवतीचा
तुझ्या असण्याचा दरवळ
घेऊन गेलीस तू बरोबर..

तू रिकामी नाही गेलीस आई
तू सोसलेले चटके
आम्ही दिलेले ओरखडे
आणि
तुझ्या वाट्याला आलेलं
भलं-बुरं सगळं
आपल्याबरोबर घेऊन गेलीस..!

***

No comments:

Post a Comment