Tuesday, 5 January 2016

न तळ न काठ


न तळ
न काठ
फक्त रहाट
जसं मन

न क्षितिज
न किनारा
फक्त गाज
तसं मन

न पंख
न पाय
फक्त प्रवास
जसं मन

न अवकाश
न काळ
फक्त श्वास
तसं मन

न आर
न पार
फक्त भान
ते मन !
***

Monday, 4 January 2016

ही प्रातःस्मरणीय मुलं...


ही पेपर टाकणारी
दूध घालणारी
गाड्या पुसणारी मुलं...
भिरभिरत असतात पहाटेपासून
त्यांच्या पायांना असतात भिंगर्‍या
आणि हात सुकाणूंसारखे
वळवत राहतात त्यांचा दिवस

त्यांच्या डोळ्यांत
नसतात अश्रू अगतिक
नसते आग विद्वेषाची
नसतो लाचार स्वाभिमान
त्यांचा रक्तदाब
होत नाही वर-खाली
निमुट धडधडत राहतं त्यांचं हृदय
जगण्याच्या अरूंद रस्त्यांवरून चालताना

दुतर्फा पसरलेले
यच्चयावत् अन्याय... भ्रष्टाचार
दंगली... तोडफोड...
वेगवेगळ्या रंगांच्या दहशती
किंवा रिअ‍ॅलिट  शोजचे अनावर उन्माद
त्यांना बिथरवत नाहीत(?)

आपली सकाळ सुरु करून देणारी
ही प्रातःस्मरणीय मुलं...!

ही पृथ्वी
केवळ गुरुत्वाकर्षणाच्या
आधारावर नाही
यांच्या अविचल जिजीविषेवर
उभी आहे तोल सावरत !

***

केव्हाची उभी आहे मी...


सगळं काही बाजूला सारून
केव्हाची उभी आहे मी
क्यूमधे
स्वतःसमोरच्या

मी उभी आहे
माझ्या नंबरावर
आणि अपाँईंटमेंट आहे
आत्ताची
या क्षणाची

पण मला बाजूला सारत
माझ्या डोळ्यांसमोर
झडप घालतंय कोण कोण
माझ्या वेळेवर

मी केव्हाची उभी आहे
क्यूमधे
या आशेनं
की कधीतरी
मला भेटता येईल स्वतःला
ठरलेल्या
आत्ताच्या या क्षणी..!
***

Sunday, 3 January 2016

कृष्ण भेटूनही


तो तिरीमिरीनं आला फुत्कारत
उभा राहिला समोर बेदरकार-
मग ठरल्याप्रमाणे
गांधारीनं
आपल्या पुण्यवान डोळ्यांवरची पट्टी
उतरवली उत्कंठेनं

तर तिच्यासमोर देह तसाच
कशाकशानं लडबडलेला
अहंकारानं झाकलेला...

कृष्ण भेटूनही
वज्रदेही होण्याची युक्ती कळूनही
तो राहिलाच कमकुवत

अमृतकुंभाच्या तळालाच भोक पडावं
तसं झालं..!
***

वाटलं होतं...


एकामागून एक पदव्या मिळवल्या
कैक ग्रंथ पालथे घातले
दूरदूरच्या यात्रा केल्या
कितीतरी कविता लिहिल्या...

वाटलं
झालो असू आपण आता
श्रीमंत, समृद्ध, प्रगल्भ...

पण नेसूच्या वस्त्रांच्या
निर्‍याच फक्त वाढत राहिल्या
स्वतःचं अनावरण करतांना
दमछाक होत राहिली
वानप्रस्थाच्या वाटेवरचं
ओझं जड होत राहिलं...

डीलर्निंगच्या कोर्सचं
सिलॅबस तेवढं विस्तारत राहिलं..!
***

Saturday, 2 January 2016

सहजीवनातल्या नात्याबद्दल


आत्मचरित्र लिहावं असं मला वाटत नाही
पण कुणी विचारलंच
आमच्यातल्या नात्याबद्दल
तर समोर ठेवता येईल एखादी कविता
टीनेजमधे ऐकलेल्या, भावलेल्या
आणि नंतर
अनुभवाच्या आसपास रेंगाळणार्‍या
चित्रपट गीतांना स्मरून...

‘ तुम गगन के चंद्रमा हो
मैं धरा की धूल हूँ ’
असं मी त्यांना कधी म्हटलेलं नाही
‘ तुम हो सागर, मैं किनारा
तुम क्षमा मैं भूल हूँ..’
असं तेही मला कधी म्हणत नाहीत

पण आमच्यातल्या नात्याबद्दल
कुणी विचारलंच
तर सांगता येईल
काहिशा याच शैलीत...
उदाहरणार्थ-

तो काही उणे काही अधिक
पण माणूस सर्वाधिक
मी त्याच्यासाठी बालक
कारण तो पूर्ण पालक

मी ओसंडणारे चित्र
तो पेलणारा कॅनव्हास
मी सत्यवान तो सावित्री
तो सुकाणू मी नाव

मी काविता तो शब्द
मी शब्द तो अर्थ
मी ओघळणारे मोती
तो बांधणारे सूत्र..

एका अनावर अव्यवहाराची
सात्विक व्यवहाराशी सांगड
तो कदाचित् शिल्पकार
मी प्रामाणिक दगड

‘तुझं-माझं’ नाही, त्याचा
‘आपलं’ म्हणण्यावर भर
तो झाडाची भूमीगत मुळं
मी वर मिरवणारा बहर

माझ्या प्रत्येक नाही-नकोला
त्याचा कृतीशील होकार
मी आत-आतला केंद्रबिंदू
तो परीघाचा विस्तार...

हा खेळ नाहीय शैलीदार शब्दांचा
मला अभिप्रेत आहे
प्रत्येक शब्दातले संपूर्ण सूचन...

मी वादळाच्या अनुवंशात
गटांगळ्या खाताना
घाबरून उद्‍ध्वस्ततेला
हात उंचावला आधारासाठी
तेव्हा मला किनार्‍याशी
सुखरूप नेणारा हात त्यांचा होता
या सुखरूपातलं सुख भोगताना
वाटतं कधी कधी
मी बचावले वाताहतीच्या शक्यतेतून,
स्थिरावले, सुखवस्तू झाले
पण दुरावले कदाचित्
निराधाराच्या ओंजळीतल्या
खडतर दानाला
जे पेलताना
पोळतात हात... किंवा जळावंच लागतं सरळ
जे मिरवण्यासाठी
लागते रणांगणावरल्या योद्ध्याची विजीगिषा
अग्निदिव्याच्या कसाला
उतरता येत नाही बहुतेकांना
चोख सोनं असल्याशिवाय...!

आंतरिक ऊर्मीनं कृतिशील राहण्याच्या
सहज वृत्तीतून
त्यांनी मला किनार्‍यावर आणलं,
दिला नवा जन्म आणि
स्वतःच्या पुण्याईच्या शिदोरीसोबत
माझ्या सुखरूप हातात ठेवला शब्द
तो प्रसवत राहिला कविता
जगण्यातल्या समजुतींच्या
पूर्वजन्मातल्या निद्रिस्त घुसमटीच्या
जाणीव विस्तारणार्‍या
स्वतःला तपासणार्‍या
मिळवलेलं शहाणपण
जगण्यात उतरवण्याचा आकांत करणार्‍या
न मागितलेलं दान देत राहणार्‍या...

मी कविता तो शब्द
मी शब्द तो अर्थ
मी अर्थ तो सार्थ..!
***

Friday, 1 January 2016

यात्रा


कोणत्याही क्षणी
पायांखाली दरड कोसळेल
तळ न दिसणार्‍या खालच्या दरीत-

कोणत्याही क्षणी
ढगफुटी होईल
थिजलेले रस्ते वाहू लागतील
पाण्याच्या लोंढ्याबरोबर-

कोणत्याही क्षणी
कर्फ्यू पुकारला जाईल
बंद होतील रस्ते.. दुकानं
दहशत पसरवली जाईल-

कोणत्याही क्षणी
स्थगित होईल अमरनाथची यात्रा
यातल्या कोणत्याही कारणास्तव..!

तरी नेमेची येणार्‍या
पानगळीकडे पाहावं
सहज स्वीकाराच्या नजरेनं
तशा सर्व दहशती झेलत
प्रस्थान ठेवतात ते
अमरनाथच्या यात्रेला
देहावर तुळशीपत्र ठेवून...
                             
स्थगित झालीच यात्रा
तर थांबून राहतात बेमुदत प्रतिक्षेत...
वाटेत कोसळतात काही दरीत...
काही मारले जातात गोळीबारात
किंवा अपघातात...
पण
असंख्य प्रकारचे असंख्य घाव सोसत
अमरनाथाचं दर्शन घेऊन
परतात सुखरूप बरेचजण
सर्व दहशतींना पराभूत करत
अमरनाथ पावल्याच्या समाधानात...

दर क्षणी
कसोटी पाहणार्‍या
या खडतर प्रवासात
घडत असेल का समांतरपणे
आंतरिक-यात्राही
आतल्या माणसाला उन्नत करणारी ?
***