Friday 18 December 2015

कुठून तरी कुठे तरी



कुठून तरी कुठे तरी एकसारखी
निमूट धावतेय मुंबईतली गर्दी...
केव्हाही काहीही होईल
अशी मनाची तयारी असलेली
स्वस्थता आहे तिच्या गतीला
एक लय आहे आनाकलनीय झिंग असलेली
प्रत्येक माणूस, इमारती, दुकानं, रस्ते.. सगळंच
वापरून वापरून
जुनं मोडकळीला आल्यासारखं
तरी मेकअप करून चालू पडलेलं...

जागोजाग मोठमोठी होर्डींग्ज
राज्यकर्त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यांची
कुठेही कशीही सांडलेली.. वाहणारी त्यांची जनता..
तिनं काय करावं या चेहर्‍यांचं?
त्यांनी काय करावं
या बेढब वाढलेल्या जनतेचं?

प्रत्येक प्रश्नापुढे हतबलतेचा पूर्णविराम !
अशा जगण्याची लाज वाटायलाही
उसंत नाही कोणाला !
माहीत नसलेली वेळ फीड केलेल्या
टाईमबॉम्बसच्या रस्त्यावरून
धावतायत सगळी...
त्याची टिक टिक ऐकू येऊ नये म्हणून
ढोल वाजवतायत जीव खाऊन
फटाक्यांच्या माळा फोडतायत
लाऊडस्पीकर्सच्या भिंती उभ्या करून
बेसूर गाणी आदळवतायत
केविलवाण्या छात्यांवर
कुणाला काही दिसू नये
म्हणून रोषणाई करतायत जागोजाग
बधीर होत चाललेल्या मनांवर
प्रदूषणांचा वज्रलेप लावतायत..!

क्षितिजाला तडा जाईल
असा आक्रोश करावा म्हणून
बेंबीच्या देठापासून उसळलेला आवेश ओसरतोय
कपाळावर आठी उमटवून जेमतेम
अशा आठ्यांचे खांब दुभंगून
कधी प्रकटतील माणसामाणसातले नरसींह?
***

No comments:

Post a Comment