Monday 1 February 2016

आता पटापट सगळ्या म्हातार्‍या

आता पटापट सगळ्या म्हातार्‍या
आपापल्या कोषात शिरून बसतील
त्यांना काही नकोय दुसरं
फक्त त्यांच्या अधू डोळ्यांसमोरच्या पोकळीत
त्यांना काहीतरी सरकत राहायला हवंय..

जुनी चलत-चित्र तुटतात सारखी
शुष्क झालीयत
चरकात फिरत राहिलेल्या
उसाच्या चोथ्यासारखी..
भुगा जुळत नाही
त्याची गळती त्यांना कळत नाही...

नवी रंगीत झगमगीत चित्रं
लखलखतात.. थिरकतात..
आक्रोश करतात.. फसफसून हसतात..
काय वट्टेल ते करतात..

पण पोचत नाहीत त्यांच्या आतपर्यंत
पानगळीसोबत सगळे काटे गळून पडलेल्या
गुळगुळीत नजरेवरून
निमूट ओघळत राहतात..
आतल्या एकाकी धुगधुगीला
एवढी सोबत पुरेशी होते...

***

No comments:

Post a Comment