Monday 1 February 2016

कुणी एकटं कसं असू शकतं?

खचाखच भरलेल्या
या बेसुमार जगात
कुणी एकटं कसं असू शकतं?

तुमचा हात ठणकला
तर वेगवेगळे
असंख्य ठणके
भोवती डोळ्यात अश्रू आणून
किंवा गिळून
ठसठसत असलेले दिसणार

तुमचं एक पुस्तक प्रकाशित झालं
तर शेकडो पुस्तकांच्या
प्रकाशनाची निमंत्रणं
झळकताना दिसणार
फेसबुकवर... वॉट्सॅपवर

तुम्ही महागडी गाडी घ्यायला जा
तुमच्या आधी कित्येक
कित्येक पाठोपाठ..

तुम्ही रेडिएशन घ्यायला जा
सर्व खुर्च्या भरलेल्या
रुमाल बांधलेल्या डोक्यांनी

तुम्ही लग्नाची तारीख ठरवून
कार्यालय बुक करायला जा
सगळी केव्हाच बुक झालेली

तुम्ही मॉलमधे जा
महागड्या हॉटेलात जा
सोनं हिरे प्लॅटिनमच्या खरेदीला जा
अॅम्ब्युलन्स मागवायला फोन करा
सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घ्यायला जा
कार पार्किंगसाठी जागा शोधायला लागा
कुठे असता तुम्ही एकटे?

अपघात पुष्कळ आत्महत्या पुष्कळ
अत्याचार पुष्कळ पुरस्कार पुष्कळ
पराभव पुष्कळ भ्रष्टाचार पुष्कळ
झोपडपट्ट्या पुष्कळ टॉवर्स पुष्कळ
रोग पुष्कळ उपचार पुष्कळ
माशा डास बुके शुभेच्छा....
पुष्कळच गोष्टी पुष्कळ पुष्कळ

अनावर श्रीमंती अनावर दारिद्र्य
अनावर उन्माद अनावर प्रमाद
अनावर वेदना अनावर याचना
अनावर झगमगाट अनावर अंधार

वाटलं तरी तुम्ही एकटे राहू शकत नाही
या अनावर पुष्कळांत..

राहून पहा
शेकडो आवाज कानांवर आदळतील
डोळे मिटून घ्या, तरीही
दृश्यांची गिचमिड सरकत राहील समोर
आक्रसून घ्या स्वतःला
कसले कसले स्पर्श बिलगत राहणार सर्वांगाला
वास शिरणार नाकातोंडात
विचार धिंगाणा घालणार डोक्यात

या सतत जोडलेपणातून
तुम्ही तुटून बाहेर पडूच शकणार नाही

या अखंड अतुट सलग विश्वात
कुणी अगदी एकटं
असूच कसं शकेल
आयुष्यात कधीही
इथे येण्यापूर्वी
किंवा इथून गेल्यावरही?

***

No comments:

Post a Comment