Monday 1 February 2016

अबाधित राहील

पासष्ठाव्यांदा अस्तित्वाचा ध्वज फडकला.
६५ x ३६५ व्यांदा दिवस उगवला.
६५ x ३६५ x २४ x ६० x ६० x … वेळा हृदय धडधडलं
अस्तित्व अबाधित राहिलं

आपापल्या क्षमतेनुसार
एकेक करत सर्वच्या सर्व पेशी
नाहीशा होऊन
एकेक करत नव्या पेशी जमा होत राहिल्या पुन्हा पुन्हा
नियत नियमांचं पालन करत
अस्तित्व अबाधित राहिलं

त्याला न कारण कळलं
न हेतू समजला इथं असण्याचा
अनेक अस्तित्वांच्या सनातन गराड्यात
अनेकांसारखं घुटमळत तिथल्यातिथे
अस्तित्व अबाधित राहिलं...

पण त्याच्यातच कोरून ठेवलेल्या
अदृश्य संकेतानुसार
काळ-वेळ.. कारण-हेतू काही न कळता
कधीतरी
ते विलीन होईल इथं नसण्यात..  

वाहत्या नदीच्या प्रवाहासारखा
वाहत राहील अस्तित्वांचा ओघ
आणि असणं अबाधित राहील..!

***

No comments:

Post a Comment