Monday 1 February 2016

ती ओळ

आठवत नाही केव्हा,
वयाच्या कितव्या वर्षी
एक ओळ लिहिली होती डायरीत-
‘हुकवुनी कित्येक मरणे जगायचे पण..’

पुढची ओळ नव्हती सुचली लगेच
नंतरही कित्येक दिवस
तशीच लटकत राहिली ती
पुढच्या ओळीच्या प्रतीक्षेत..

काळाच्या ओघात मग
जगण्याच्या सहज ऊर्मीनं
निष्प्रभ करून टाकला त्या ओळीतला ‘पण’
आणि हळूहळू पूर्ण ओळच ओलांडून
पुढच्या पानांवर उमटत गेल्या
कित्येक ओळी वेगळ्याच..

उलटत गेली डायरीची पानं भराभर
जमत राहिले थरांवर थर...
वाटलं एव्हाना
गुदमरून निष्प्राण झाली असेल ती ओळ

पण नाही...
जगणं नव्यानं साजरं करणार्‍या
वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर
लगबगीनं अवतीर्ण झालीय ती पुन्हा
मधल्या सगळ्या पानांचे थर अलगद बाजूला सारत
डायरीच्या आजच्या तारखेवर
आणि केव्हापासूनचं आसुसलेपण ओथंबलंय
पुढच्या ओळीची वाट पाहणार्‍या
तिच्या अथक डोळ्यांत..!

***

No comments:

Post a Comment