Monday 1 February 2016

एक दर्शनबिंदू होतीस तू

आई,
१९२६ ते २०१५
या दीर्घ कालखंडाकडे पाहणारा
असंख्यांमधला एक दर्शनबिंदू होतीस तू

तू नव्हतीस कुणी सिद्धहस्त लेखिका
पण तू पाहिल्यास
प्रत्यक्ष अनुभवल्यास
कितीतरी वास्तव कथा
जगलीस त्रिखंडात्मक कादंबरी..!

सहनशीलतेच्या कवच्यात दबले गेलेले
कितीतरी आक्रोश.. आकांत
शारिरिक मानसिक अपमान.. फरपट
कडेलोटाच्या प्रसंगांमधली हतबलता
आणि माझ्या आकलनाबाहेरचं काय काय..
शब्दबद्ध झालं नाही कधीच..

बुडू न देता
तू वल्हवत राहिलीस आपली नाव
प्रवाहाशी इमान राखत..

‘कुर्वन् एव इह कर्माणि जिजीविषेत शतं समाः’
हे शिकली नव्हतीस तू कधी
असं कुणी लिहून ठेवल्याचं
तुझ्या कानावरही आलं नसेल कदाचित
पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष जगलीस तू आई
‘कर्म माणसाला बांधत नाही’
याची तुला पर्वाही नसेल
पण ‘या शिवाय दुसरा मार्ग नाही’
यातली अपरिहार्यता तर तू
भोगलीस आणि निभावलीसही..!

परीकथेतल्यासारखं
सात समुद्र.. सात अरण्य.. सात बोगदे..
पार केल्यावर मिळणार्‍या
भरजरी सुखासाठी म्हणून नाही
पण तू पार केलेस
तसले दुर्गम काळाचे टप्पे
आणि भोगलंस मिळालं ते सुख
भरजरी म्हणून मिरवत..!

जगण्यावरची ही अपार निष्ठा
जगण्यातली असोशी
बोगद्यांपलिकडे उजेड असेलच
हे माहीत नसतानाही
ते ओलांडण्यासाठी
चालत राहण्यातली ऊर्जा
हे सगळं
कुठून मिळवलंस आई?
विचारायचं राहून गेलं..!

***

No comments:

Post a Comment