Monday 1 February 2016

एका कवितेत मी लिहिलं होतं

आई,
एका कवितेत मी लिहिलं होतं
‘कुणी एकटं असूच कसं शकेल
आयुष्यात कधी
किंवा इथून गेल्यावरही..?’

इथं तर गोकुळातच होतीस तू
भोज्ज्याच्या खांबासारखी
सगळे अवती-भवती.. पाठीशी होते तुझ्या

पण इथून गेल्यावर?..

इथं जमलेल्या सगळ्यांनी तर
उचलून नेला पुरावा
तू होतीस इथं याचा
हाय व्होल्टेजनं
नष्ट केला तो काही क्षणात
आणि उरला सुरला
विसर्जित केला गेला
रिवाजानुसार..

अदृश्य रूपातल्या तुलाही
मुक्त झाल्याचं पाहिलं सगळ्यांनी
कावळ्याची साक्ष मानून
आणि काहिशा समाधानानं
परतले आपापल्या आयुष्यात..

पण तू?
खरंच नाहीएस ना एकटी?
नसणारच..!

इथं होतीस तेव्हापासूनच
अमिबासारखी विभागत विभागत
अनेक होत राहिली होतीस
तन-मन... तुझं समग्र असणंच
विस्तारत होतं
अनेक रूपांमधे...
आता भोज्ज्याचा खांब नाही
अख्खं गोकूळच झालीएस तू आई..!

काळाच्या ओघात
विस्तारेल तेही
विस्तारतच राहील अव्याहत...

कुणी कसा नष्ट करू शकेल
तू एकटी नसण्याचा पुरावा?

***

No comments:

Post a Comment