Monday 1 February 2016

ही जी कडवट चव आहे ना

ही जी कडवट चव आहे ना
काळवंडलेल्या काटेरी जिभेवर रेंगाळलेली
तिच्या शेवटच्या टोकाशी म्हणे
मधाचं पोळं आहे लटकलेलं...

खुशाल असूदे मग ती आहे तिथे!
थेंब थेंब पाझरत
आतवर अंथरल्या गेलेल्या
कडू वाटेवरून चालताना
आपल्या इतमामात
पसरलेली राहूदे पावलांखाली...
पण नजर खिळलेली राहूदे
पोळ्यातल्या मधाच्या गोडीकडे

पाळतीवर असलेल्या
मधमाशांच्या दंशाची दहशतही
भिववेल वाटेत चालताना
पण दोन हात कारायला तरी
कुणीतरी असलेलं बरंच ना
कडवट चव एकाकी पार करताना...

शिवाय त्यांच्याशी दोन हात करताना
नकळत होईल व्यायाम
शिथिल स्नायू पुष्ट होतील अनायसेच...

जिभेवर ठाण मांडून बसलेली
कडवट चव
जाग आणून आणखी काय काय
पुष्ट करत असेल
तिकडे लक्षच जात नाही आपलं..
उमगत नाही तिचा अंतस्थ हेतू..!

‘दृश्या’चं असं पुनर्वाचन करता आलं
तर किती बदलून जातो ना
समोरच्या घटनांचा अर्थ..!

***

No comments:

Post a Comment