Monday 1 February 2016

मी परत परत आठवतेय

आई,
मी परत परत आठवतेय
तू गेलीस ती सकाळ
क्रमानं आठवू पाहतेय
उठल्यापासून
तू काय काय आणि
कसं कसं केलंस ते..

कमालीचा थकवा होता
तुझ्या हालचालींमधे
तरी रोजच्या सारखंच केलंस सगळं..
वाटलंही नाही
की ‘तो’ क्षण इतक्या जवळ उभा आहे..

सगळं आवरून तू झोपलीस
नेहमीप्रमाणेच
मी कामाला लागले
आणि थोड्याच वेळात
तू अस्वस्थ झालीस..

उठत.. झोपत.. तळमळत
म्हणत होतीस
‘आता सहन होत नाही..
मी निघाले..’
मी अगदी जवळ होते तुझ्या
तरी काहीच ठाव लागत नव्हता
तुझ्या ‘प्राणांतिक’ वेदनांचा
कळत नव्हतं
तुला काय सहन होत नाहीए ते..
तुझे हात पाय चोळावेत
तुझ्या अंगावरून हात फिरवावा
विचारावं तुला की काय होतंय?..
असं काहीच सुचलं नाही..
तूच थकून
छातीवर डोकं टेकवलंस
तेव्हा जवळ घेतलं
बोलले काहीतरी..

थेट तुलाच समजून घेत
तुला आधार देण्याऐवजी
डॉक्टरांना फोन करत राहिले
आणि हतबल होऊन
पाहात राहिले नुसती
मी जवळ होते अगदी
तरी तू एकाकी झालीस आई..!
  
शेवटी तू उशीवर डोकं टेकवलंस
पाय खालीच राहिलेले
ते मी उचलून कॉटवर ठेवले
तुला समजलंही नसेल ते..
सगळ्या यातना संपल्यासारखी
शांत झाली होतीस
मी पाहात होते आशेनं..

पण आई, यातना नाही
तुझं असणंच संपत होतं..
दिसत होतं
श्वास हळूहळू मंदावत चाललाय ते
एकदा ओठ हलले फक्त
श्वासासाठीचा
शेवटचा प्रयत्न होता का तो?
धडधड पूर्ण थांबली
तू शांत झालीस..

मी बसून राहिले जवळ
अश्रू ढाळत..

डॉक्टर आले
त्यांनी डोळ्यात बॅटरी टाकून पाहिलं
‘तो’ येऊन गेल्याचं चिन्ह दिसलं त्यांना तिथे
त्यांनी नाडी पाहिली थांबलेली
आणि तुझ्या जाण्यावर शिक्कामोर्तब केलं..!!

तो कोणता क्षण?
नेमका केव्हा आला मृत्यु?
मी इतकी जवळ होते
पाहात होते अनिमिष
तरी समजलं नाही
तो केव्हा आला
तू केव्हा गेलीस..

पूर्ण घटनाक्रमाला साक्षी होते मी
सगळं माझ्या डोळ्यादेखत घडलं
तरी दिसले नाहीत त्याचे हात
तुला घेऊन जाणारे
तू तर शांत निजलेली माझ्या समोर
मग ‘गेलीस’ म्हणजे झालं तरी काय?
त्यानं काय नेलं तुझ्यातलं?

पंचेंद्रियांची उरली सुरली क्षमता?
की आहेपणाची जाणीव?
की कोणत्याही स्कॅनिंगमधे
न दिसणारा प्राण?
की अव्याख्येय आत्मा?

की नेणारं जाणारं असं
कुणी.. काही नाहीच
तो क्षण म्हणजे केवळ
एका स्वयंचलित
रासायनिक विघटन-प्रक्रियेची
सुरुवात होता?

***

No comments:

Post a Comment