Monday 1 February 2016

एक अद्‍भुत करार

आपल्या भोवती
काठोकाठ भरून राहिलेला
अ-मृत प्राण
आपल्या आतल्या अस्थिर प्राणाला
असंख्य मितींमधून भेटत असतो अव्याहत...

एका अदृश्य नाक्यावर
निरंतर होत असते देवाण-घेवाण
त्यांच्यात
शब्द स्पर्श रस रूप गंधांमधून...

एखादा शब्द पडतो कानांवर
तेव्हा ते नुसतं ऐकू येणं नसतं..
त्वचेला जाणवतो काट्याचा सल
किंवा मंद झुळुकेचा गारावा
तेव्हा ते नुसतं स्पर्श अनुभवणं नसतं..
जिभेला कळते कडवट चव
सरपटत आतवर पोचणारी
किंवा तिखटाची झिणझिणी
डोळ्यात पाणी आणणारी
तेव्हा ते फक्त चव कळणं नसतं..
नजरेला दिसतात असंख्य रंगाकार
क्षणोक्षणी बदलणारे
ते फक्त नेत्रसुख नसतं..
आपसुक येतो हवेवर तरंगत
गलिच्छ गंध
किंवा अनाहूत केवडा
आणि उमटवतो मनावर आपला असर
तो केवळ वासाचा नसतो...

पंचेंद्रियांना कळणारी
अशी हरएक संवेदना
आपल्या प्राणाशी हस्तांदोलन करून
आत प्रवेश करते
त्या प्रत्येक क्षणी
शब्द स्पर्श रस रूप गंधांमधून
दोन प्राणांच्या मध्यसीमेवर
होत असतो एक अद्‍भुत करार
आयुष्य रीन्यू केल्याचा..!

***

No comments:

Post a Comment