Friday 1 January 2016

यात्रा


कोणत्याही क्षणी
पायांखाली दरड कोसळेल
तळ न दिसणार्‍या खालच्या दरीत-

कोणत्याही क्षणी
ढगफुटी होईल
थिजलेले रस्ते वाहू लागतील
पाण्याच्या लोंढ्याबरोबर-

कोणत्याही क्षणी
कर्फ्यू पुकारला जाईल
बंद होतील रस्ते.. दुकानं
दहशत पसरवली जाईल-

कोणत्याही क्षणी
स्थगित होईल अमरनाथची यात्रा
यातल्या कोणत्याही कारणास्तव..!

तरी नेमेची येणार्‍या
पानगळीकडे पाहावं
सहज स्वीकाराच्या नजरेनं
तशा सर्व दहशती झेलत
प्रस्थान ठेवतात ते
अमरनाथच्या यात्रेला
देहावर तुळशीपत्र ठेवून...
                             
स्थगित झालीच यात्रा
तर थांबून राहतात बेमुदत प्रतिक्षेत...
वाटेत कोसळतात काही दरीत...
काही मारले जातात गोळीबारात
किंवा अपघातात...
पण
असंख्य प्रकारचे असंख्य घाव सोसत
अमरनाथाचं दर्शन घेऊन
परतात सुखरूप बरेचजण
सर्व दहशतींना पराभूत करत
अमरनाथ पावल्याच्या समाधानात...

दर क्षणी
कसोटी पाहणार्‍या
या खडतर प्रवासात
घडत असेल का समांतरपणे
आंतरिक-यात्राही
आतल्या माणसाला उन्नत करणारी ?
***

No comments:

Post a Comment