Saturday 30 January 2016

पण तिची नवजात लेक…

तिनं बाळाला जन्म दिलाय नुकताच
बाळाबरोबर तिचाही झालाय पुनर्जन्म
सुखरूप आहेत बाळ बाळंतीण..
हळूहळू भानावर येतेय ती
कुणी बर्फी कुणी बुके घेऊन आलंय
अभिनंदन करतायत तिचं आणि
तिच्या नवजात मुलीचं
जन्माआधीचा जीवघेणा लढा जिंकला म्हणून.!

तिच्या गळ्याशी दाटून आलाय अनावर हुंदका
शिणलेल्या प्राणांमधून
फुटू पाहतोय आनंद लढाई जिंकल्याचा
ओसंडतोय संताप लढावं लागल्याचा
पाझरतेय वेदना पार्थीव जखमांची
निथळतेय भीती प्रत्येक नवागत क्षणाची
वाहातेय चिंता या अक्राळ-विक्राळ जगात
लेकीला जगवण्याची...!!

तिनं कष्टानं आवरून धरलाय गदगद हुंदका
पण तिची नवजात लेक
सर्वांगानं रडतेय सडेतोड खुल्या आवाजात
आकांत मोकळा करतेय एकदाच
पुढे कधीच रडावं लागू नये म्हणून
पावलापावलाला लढावं लागलं तरी.!
***

No comments:

Post a Comment