Friday 29 January 2016

किती असहाय्य..

किती असहाय्य
परावलंबी असतो बाप..
शरीराबाहेर
कुण्या पोपटात प्राण असणार्‍या
परीकथेतल्या राजासारखा...

त्याच्या संपूर्ण असणेपणाचा अंश
क्षणा-कणांनी
वाढत..विकसत..साकारत असतो
त्याच्या शरीराबाहेर
दुसर्‍या एका शरीरात...
तो अनुभवू शकत नाही
तिथे चाललेला सृजन-सोहळा
‘छिन्नी-हतोड्या’चा एकेक घाव सोसत
शिल्पाला जन्म देण्याच्या प्रक्रियेतील
पार्थिव वेदनांची चव
नाही समजू शकत त्याला...

आपलं ‘आत्मज’ रूप
पाहण्यासाठी आतूर बाप
अस्वस्थ येरझार्‍या घालत असतो
लेबररूमच्या बाहेर...

त्याचं सर्वस्व.. त्याचं नवं रूप
असतं पूर्णतः दुसर्‍याच्या पदरात..
त्याला व्यक्त करता येत नाही
आतून दाटून येणारा उमाळा
अनुभवता येत नाही तुटून अलग होणं
आणि पुन्हा छातीशी धरणं...

रीतीनुसार
त्याला फक्त चिकटवता येतं बाहेरून
आपल्या अंशाला आपल्या नावाचं लेबल..
त्याला शिकवलं गेलंय
बिंबवलं गेलंय त्याच्यावर
नामानिराळं राहाणं.. नाकारणं
किंवा नुसता अहंकार बाळगणं पिता असण्याचा

किती असहाय्य.. परावलंबी होतो बाप
जेव्हा त्याला होता येत नाही
आपल्या बाळाची आई, व्हावंसं वाटलं तरी..
कितीही तुटला जीव
कितीही अनावर झालं वात्सल्य
तरी फुटू शकत नाही पान्हा..
किती असहाय्य.. परावलंबी असतो बाप...!

***

No comments:

Post a Comment