Monday 18 January 2016

पाऊस पाहतो दुरुनी

धरतीच्या अंगावरची
शेवाळुन जाते माती
थरथरत उभी ती झाडे
रस्त्याच्या काठावरती

डबक्यात साचते पाणी
मातीतही थोडे मुरते
निमुळत्या कठिण वाटांनी
उतरून नदीला मिळते

भिजतात पंख पक्ष्यांचे
प्राण्यांची अंगे ओली
हिरवळीत फुलते स्वप्न
झोपडीत चूल निमाली

रस्त्यात तुंबते गर्दी
शंकेने घर घाबरते
बाळांची किरकिर भोळी
मन पाकोळीचे होते

पाऊस पाहतो दुरुनी
रिमझिमतो स्वांतसुखाय
कधि पिसाटापरी पडतो
कधि अखडुन घेतो पाय.!

***

No comments:

Post a Comment