Thursday 28 January 2016

साक्षी

अनेक वर्षे
खोलीतल्या भिंतीला टेकून
उभा आहे तो
त्याच्या संमुख येईल
तो खोलीतला सर्व तपशील
आपल्या अंतरंगात
धरून ठेवलाय त्यानं असं वाटतं

पण
त्याच्या समोर येईल
त्या कुणालाही तो दाखवतो
निखळ त्याचं प्रतिबिंब
जसंच्या तसं
तेव्हा
खोलीतल्या तेवढ्या आकाराचा
तपशील
नव्हताच कधी तिथं
इतक्या सहज पुसलेला असतो !

मीही पाहात असते स्वत:ला
त्याच्या आत डोकावून
येताजाता नोंदवत असते
त्याचं प्रतिबिंब दाखवणं
जराही उणं अधिक न करता
एखाद्या विश्वस्तासारखं
केवळ साक्षी होऊन राहाणं
खोलीतल्या प्रत्येक क्षणाला

अनुभवत असते त्याचं
नितळ स्वच्छ कोरं असणं
वाट्याला येईल ते सारं
स्व-रूपात
प्रतिबिंबित होऊ देऊनही !

***

No comments:

Post a Comment