Saturday 30 January 2016

कळ दाबताच..

कळ दाबताच संगणकावर उघडेल
नव्या तंत्रज्ञानाच्या कुंचल्यानं सजवलेलं
माझं सुंदर लेटरहेड
मी टाईप करीन त्यावर
तुझ्या आवडत्या फाँटमधे- प्रिय
आणि त्याखाली उमटत जातील भराभर
एका लयीत शब्दांमागून शब्द...

पत्र पूर्ण झालं की खाली
आपोआप येईल माझी लफ्फेदार सही
आधीच स्कॅन करून ठेवलेली
आणखी काही बटणांचा अवकाश
की ई-मेलचं कबूतर ते क्षणार्धात पोचवेल
जगाच्या दुसर्‍या टोकाशी असलेल्या तुला
तू असशील तत्पर.. नेटला जोडलेला..
लगेच उघडून वाचशील
माझं सुंदर अक्षरांतलं पत्र

तुला कळेल माझी खुशाली,
इकडे काय काय घडलं
काय काय बिघडलं
याचा साद्यंत तपशील कळेल तुला लगेच
पण तुला कळणार नाही
शब्द जुळवताना झालेली खाडाखोड..
टाईप करताना किती थरथरले हात
ते सांगणार नाहीत
रेखीव फाँटमधले शब्द
आणि स्कॅन केलेली सही
तर दिसूच देणार नाही
आतली खळबळ
नुसती हसत राहील
माझ्या स्टॅच्यू झालेल्या फोटोसारखी !!

***

No comments:

Post a Comment