Tuesday 12 January 2016

तहानेचे भाग्य

लागायच्या आधीच का
माझी तहान विझली?
गुंतायच्या आधी कशी
सुटकेची घाई झाली?

खोदलेच नाही तरी
अशी कशी मी थकले?
अतृप्तीच्या अभावाला
तृप्ती मानून टाकले

रक्तामधे आले कसे
समाधानाचे दारिद्र्य?
घाबरून नाकारले
विद्ध तहानेचे भाग्य

तशा आकांताने काही
कसे मागितले नाही?
कोंभ फुटावा इतकी
भुई तडकली नाही !

***

No comments:

Post a Comment