Sunday 17 January 2016

बाहेर जळाले काही

बाहेर जळाले काही
तो धुरकटला प्राजक्त
पानात कोंडुनी श्वास
देठात साकळे रक्त

बाजूला करुनी पडदा
शोधला धुराचा थांग
परतले नजर वळवून
दिसली न कुठेही आग

मग पुन्हा अचानक आला
केशरी कुठुनसा गंध
घालून झडप श्वासांनी
हृदयातच केला बंद

पण वास धुराचा ऊग्र
ओलांडुन त्याला आला
केशरी देठ गंधाचा
घुसमटून पुरता गेला

का ठाव घेतला नाही
मी अनाहूत गंधाचा?
का धूर अडवला नाही
कळुनही थांग आगीचा?
***

No comments:

Post a Comment