Saturday 30 January 2016

तेव्हा

तेव्हा..

तेव्हा अनावर होती ओढ
प्रत्यक्ष भेटीची
दाटून आलेला गहिवर
पापण्यांशी ओथंबून यावा तशी

विरह ओघळत राहायचा
माहीत नसायचं
भेट होईल की नाही
माहीत नसायचं
कुणाची वाट पाहणं आहे ते..
कशाची ओढ आणि
कशासाठी तेही..

पण मनात तगमग तगमग
हृदयात धगधग.. प्राण फडफडत असायचा
देह पुरता तहानलेला
शहारा त्वचेवर अंथरलेला असायचा..
तेव्हा अनावर होती ओढ...
***
  

तेव्हा.. २

तेव्हा नव्हतं कळत
तू कोण आहेस
तुझं नाव गाव रंग रूप
नव्हतं माहीत काही
नुसतीच अनामिक ओढ जीवघेणी..

हळूहळू उमगलं
तुला नाहिए काही ठावठिकाणा
नाव गाव रंग रूप काहीच..
तु नाहिचेस..

आहे एक अधांतर.. निराधार
असीम पोकळी.. भिववणारी
जाणिवेला भोक पाडणारी
मृगजळ पुसून टाकणारी
माघारी आत वळवणारी..

हळूहळू उमगलं परतीच्या वाटेवर
तू म्हणजे केवळ असणं आहेस
मी आहे म्हणजे मीच तू असणार...
काहीसं कळतंय बुद्धीला

पण देहाला तहान हवी आहे पुन्हा
त्वचेवर शहारा हवा आहे
मनात तगमग हृदयात धगधग
प्राण फडफडायला हवा आहे..
पुन्हा पुन्हा...!

***

No comments:

Post a Comment