Thursday 28 January 2016

कुठे गेल्या सगळ्या !

चिमण्या
गायब झाल्यायत केव्हाच्या
दिसत नाहीएत
कुंड्यांवर
खिडकीच्या गजांवर
चिवचिवत नाचतांना
टिपून आणलेले दाणे
घरट्यातल्या आपल्या पिलांना
भरवतांना

दिसत नाहीएत कुठेच
कुठे निघून गेल्या सगळ्या
कुणाला काही न सांगता ?
की कुणी हद्दपार केलं त्यांना
काही कारण न देता
उगीच गम्मत म्हणून ?

की गिळून टाकली कुणी
त्यांची अंडी
एकेक करत...
खुडून टाकला
त्यांचा पंख पसरून
आकाशात झेपावण्याचा
चिवचिवत जगण्याचा हक्क ?

सर्वत्र ऐकू येतेय
नुसती काव काव
कुठे हरवलं
चिमण्यांचं भरलं गाव ?

***

No comments:

Post a Comment