Monday 25 January 2016

जमेल ना हे त्याना ?

उंच झोका घ्यायला
मी घाबरायची
तेव्हा बाबा
मी व्हावी धीट म्हणून
जोरात ढकलायचे
माझा झोका
माझ्या रडण्याकडे दुर्लक्ष करत

शाळेच्या पहिल्या दिवशी
आईनंही समजावत, रागावत
काढलं होतं मला घराबाहेर
बाहेरच्या जगाची
ओळख व्हायलाच हवी म्हणून

हे काय ? कां ? असंच कां ?
असल्या प्रश्नांना तेव्हा दिली त्यांनी
मला समजतील अशी उत्तरं

पण आता
त्यांच्याच इच्छेनुसार
मी धीट झाल्यावर
कसनुसे होतायत बाबा
मी आकाशात झेपावायच्या
गोष्टी करायला लागले की
होतायत कावरेबावरे

अंधाराला न घाबरण्याविषयी
समजावणारी आई
अपेक्षा करतेय मनातल्या मनात
मी परतावी घरी
अंधार व्हायच्या आत !

हे काय ? का ? असच का ?
असल्या प्रश्नांना
ते देऊ शकत नाहीयेत उत्तरं
माझ्या वाढत्या वयाला
पटतील अशी

आणि मला
माझ्या नव्या जगाकडून
मिळणारी उत्तरं
त्यांना घाबरवतायत !

आता
मी सांगतेय त्यांना
सतत कानावर पडणार्‍या
आजच्या इसापनीतीच्या गोष्टी
त्यांनी धीट व्हावं म्हणून...!

जमेल ना हे त्यांना ?

***

No comments:

Post a Comment