Thursday 28 January 2016

एकटी नाही

दर चौरसफुटावर एक-दोन
या दरानं वाहणार्‍या गर्दीतून मी चाललेय
एकटी

आत याहून घन
याहून वेगवान गर्दी
दोहोच्या मधून मी चाललेय
एकटी...

साचलेल्या पाण्याचे
ओसंडणार्‍या उकिरड्यांचे
वेगवेगळ्या मसाल्यांचे
कापल्या जाणार्‍या माशांचे
गुटका, तंबाखू, सिगरेट... घामाचे
दर्प ओलांडत...
आकाशाचे दुरुन साजरे दिसणारे
क्षणाक्षणाला बदलणारे रंग बघत...
रस्त्याच्या कडेला लावलेल्या,
सावलीचा दुरुपयोग होत असलेल्या
झाडांच्या नजरा चुकवत...
कुत्री, कावळे, वाहनं... माणसं
यांतून वाट काढत
मी चाललेय...

ठरलेल्या भोज्याला शिवून
परतायचंय छोट्या परिघात
कुठेही, कसलीही, कुणाहीबद्दलची
तक्रार न नोंदवता...
साबणानं स्वच्छ धुवून टाकायचेत
रंध्रारंध्रांतून उमटलेले निर्जीव शहारे
आणि टीव्ही ऑन करुन
निमूट पाहात बसायचंय
वेगवेगळे धुमाकूळ
कासाविस न होता...

बधीर होत जाण्याच्या
एका निष्ठूर प्रक्रियेतून मी चाललेय...
एकटी नाही
गर्दीतल्या सगळ्यांसह !

***

No comments:

Post a Comment