Friday 29 January 2016

पराभव ?

माझ्या विचारांच्या
काही पेशींमधे
निजलेले असते
आदिवासी दु:ख..
काहींमधे
मिणमिणत असते
देवदासींच्या
व्यथेची ज्योत..

काहिंनी ऐकलेले असतात
समाजाने झाकून ठेवलेले
तृतीयपंथी
टाळ्यांचे आवाज..
काहिंनी वाचलेल्या असतात
उच्चभ्रू एकट्यांच्या
बिथरवणार्‍या कहाण्या..

काहिंना घडते रोज
दुरुन
भयभीत करणारे
विश्वरूपदर्शन
दिव्यदृष्टीविना

तरी
माझ्या पुनर्जन्मांचा परीघ
घुटमळत राहतो
माझ्या पार्थिव जन्मातील
माझ्या संवेदनकक्षेच्या
केंद्रबिंदूभोवती
वाचून... ऐकून...पाहून
करकरुन विचार
केंद्राने
विस्तारला आपला परिघ
तरी त्या परीघाला
भेदता येत नाहीत
विजातीय संवेदनांच्या केंद्रांचे
विजातीय परीघ...

याला म्हणता येईल कदाचित
अभेद्य गुरुत्वाकर्षणाचा चिरंतन विजय
किंवा
सपशेल पराभव
‘स्व’ चा ‘स्व’ ने केलेला !

***

No comments:

Post a Comment