Saturday 30 January 2016

तो शीळ घालतोय

तो शीळ घालतोय
बघतोय इकडे तिकडे
विश्वासानं तो आलाय तिथं
नेहमीच्या उतारावर
कलत्या संध्याकाळी

दिवसाचं गाठोडं बाजूला ठेवून
निरखतोय मावळता उजेड
पाण्यात मिसळताना
झाडं अंधारताना
पक्षी परतताना
हवा मौनात शिरताना

अनुभवतोय
स्वतःला
जन्मकळातून सांडलेला
श्वासांनी लगडलेला
आयुष्याला भिडलेला
जगण्यात बुडलेला..

रात्र येईल इतक्यात
दिवसाचं गाठोडं घेऊन जाईल
तो उठेल कफल्लक
नि चालू लागेल बिनबोभाट
नवागताकडे..!

***

No comments:

Post a Comment