Thursday 28 January 2016

मृत्युंजय हिम्मत

प्रलयकारी वादळात
अचानक उन्मळून पडला तो
खोलवर पसरलेली मुळं
उखडून वर आली
तसा भुईसपाट
अस्ताव्यस्त कोसळला
भर रस्त्यात !

रहदारीतला
अडथळा दूर करण्यासाठी
भराभर छाटून टाकल्या गेल्या
त्याच्या फांद्या जून कोवळ्या पानांसकट
आड येणारा बुंधाही
कापून टाकला गेला...

उखडून वर आलेली मुळं
उघडी एका बाजूला
आणि कापल्या गेलेल्या बुंध्याची
पिवळी, गोल, ओस
तरी तुकतुकीत दिसणारी
चकती दुसर्‍या बाजूला

जमीन आणि आकाशाशी
संबंध तुटलेला
खोडाचा शेवटचा अवशेष
सरकवून ठेवला गेला
भिंतीकडेला...
रहदारी सुरु झाली !

मात्र त्या दुर्लक्षित
खोडाच्या तुकड्याच्या रंध्रारंध्रांतून
सर्वांच्या नकळत
डोकावू लागली
हिरवी जिजीविषा
आणि प्रलयकारी वादळाचा
पराभव करत
फुटू लागली पानांमागून पानं
छोट्या छोट्या फांद्या
मान वर करुन
पाहू लागल्या आकाशाकडे...!

बुंध्याचा तो तुकडाच झाला बीज
झाला जमीन... खत... पाणी

आता कोणी रोखू शकत नाही
त्याचं फळणं, फुलणं, बहरणं...

आता त्याचा वृक्ष होणार पुन्हा
नव्या प्रलयाशी टक्कर देण्याची
मृत्युंजय हिम्मत
सळसळणार पानापानांतून...!

***

No comments:

Post a Comment