Monday 18 January 2016

प्रश्न

उजेडाची स्वप्न होऊन
आपली झोप उडवतात
चिरंजीव प्रश्न
तहानलेल्या व्याकुळ हरणांसारखे
धाववतात आपल्याला उत्तरांच्या मृगजळामागे
आपलं शांतवन उद्‍ध्वस्त करतात
डसत राहतात चहुकडून

स्वस्थ राहू न देणारी
अमिट प्रश्नांची ऊर्जा
खेचत राहते आपल्याला
उत्तरांच्या दिशेने
मग निमूट चालत राहतो आपण
चालतच राहतो अथक ....

पण प्रश्नांची आच जेवढी
तेवढंच पडतं आपल्या झोळीत
तेवढाच उजळतो अंधार
नव्या प्रश्नांच्या गारगोट्या
घासाव्या लागतात एकमेकींवर
नव्या ठिणगीसाठी
झुंझावे लागते स्वत:शी
पुन्हा पुन्हा...

पावलापुरताच उजेड दाखवते
प्रत्येक नवी ठिणगी
दिलासा देते क्षणमात्र
स्वत:च्या उजेडात पाऊल टाकण्याचा
चालण्याचं श्रेय ठेवते हातात
आणि दाखवते
भोवतीचा अपरंपार अंधार
आपल्यातल्या सूप्त ठिणगीला
सतत आव्हान देणारा !

***

No comments:

Post a Comment