Saturday 2 January 2016

सहजीवनातल्या नात्याबद्दल


आत्मचरित्र लिहावं असं मला वाटत नाही
पण कुणी विचारलंच
आमच्यातल्या नात्याबद्दल
तर समोर ठेवता येईल एखादी कविता
टीनेजमधे ऐकलेल्या, भावलेल्या
आणि नंतर
अनुभवाच्या आसपास रेंगाळणार्‍या
चित्रपट गीतांना स्मरून...

‘ तुम गगन के चंद्रमा हो
मैं धरा की धूल हूँ ’
असं मी त्यांना कधी म्हटलेलं नाही
‘ तुम हो सागर, मैं किनारा
तुम क्षमा मैं भूल हूँ..’
असं तेही मला कधी म्हणत नाहीत

पण आमच्यातल्या नात्याबद्दल
कुणी विचारलंच
तर सांगता येईल
काहिशा याच शैलीत...
उदाहरणार्थ-

तो काही उणे काही अधिक
पण माणूस सर्वाधिक
मी त्याच्यासाठी बालक
कारण तो पूर्ण पालक

मी ओसंडणारे चित्र
तो पेलणारा कॅनव्हास
मी सत्यवान तो सावित्री
तो सुकाणू मी नाव

मी काविता तो शब्द
मी शब्द तो अर्थ
मी ओघळणारे मोती
तो बांधणारे सूत्र..

एका अनावर अव्यवहाराची
सात्विक व्यवहाराशी सांगड
तो कदाचित् शिल्पकार
मी प्रामाणिक दगड

‘तुझं-माझं’ नाही, त्याचा
‘आपलं’ म्हणण्यावर भर
तो झाडाची भूमीगत मुळं
मी वर मिरवणारा बहर

माझ्या प्रत्येक नाही-नकोला
त्याचा कृतीशील होकार
मी आत-आतला केंद्रबिंदू
तो परीघाचा विस्तार...

हा खेळ नाहीय शैलीदार शब्दांचा
मला अभिप्रेत आहे
प्रत्येक शब्दातले संपूर्ण सूचन...

मी वादळाच्या अनुवंशात
गटांगळ्या खाताना
घाबरून उद्‍ध्वस्ततेला
हात उंचावला आधारासाठी
तेव्हा मला किनार्‍याशी
सुखरूप नेणारा हात त्यांचा होता
या सुखरूपातलं सुख भोगताना
वाटतं कधी कधी
मी बचावले वाताहतीच्या शक्यतेतून,
स्थिरावले, सुखवस्तू झाले
पण दुरावले कदाचित्
निराधाराच्या ओंजळीतल्या
खडतर दानाला
जे पेलताना
पोळतात हात... किंवा जळावंच लागतं सरळ
जे मिरवण्यासाठी
लागते रणांगणावरल्या योद्ध्याची विजीगिषा
अग्निदिव्याच्या कसाला
उतरता येत नाही बहुतेकांना
चोख सोनं असल्याशिवाय...!

आंतरिक ऊर्मीनं कृतिशील राहण्याच्या
सहज वृत्तीतून
त्यांनी मला किनार्‍यावर आणलं,
दिला नवा जन्म आणि
स्वतःच्या पुण्याईच्या शिदोरीसोबत
माझ्या सुखरूप हातात ठेवला शब्द
तो प्रसवत राहिला कविता
जगण्यातल्या समजुतींच्या
पूर्वजन्मातल्या निद्रिस्त घुसमटीच्या
जाणीव विस्तारणार्‍या
स्वतःला तपासणार्‍या
मिळवलेलं शहाणपण
जगण्यात उतरवण्याचा आकांत करणार्‍या
न मागितलेलं दान देत राहणार्‍या...

मी कविता तो शब्द
मी शब्द तो अर्थ
मी अर्थ तो सार्थ..!
***

No comments:

Post a Comment