Thursday 28 January 2016

भर रस्त्यावर

भर रस्त्यावर
किती बेभरवश्याच्या ठिकाणी
उगवलाय चिमणचारा
कुणाचाही सहज पडेल पाय
त्या झिरमिरीत पारदर्शी तुर्‍यावर
किंवा वेगात धावत येणारी चाकं
त्याला चिरडून नकळत
जातील निघून

कधीही तुटून पडेल
किंवा तोडली जाईल
अशा फांदीवर घरटं करुन
आपल्या पिलांना त्यात अलगद ठेवणार्‍या
चिमणी इतकाच
बेफिकीर आहे
तिच्यासाठी उगवलेला
चिमणचारा

त्याला कळत नाहीय का
की काळ बदलत चाललाय सुसाट वेगानं ते
आणि बेसुमार वाढत चाललीय वर्दळ ते
आणि कुणाला इकडेतिकडे, खाली
आत बघायला वेळ नाहीय ते ?

खुशाल उगवलाय भर रस्त्यात
एकूणएक असण्याचा स्वामी असल्यासारखा
किंवा उगवण्याच्या क्षणांखेरीज
काहीच आपलं नसल्यासारखा

उगवलाय चिमणचारा !
***

No comments:

Post a Comment