Monday 18 January 2016

इथे आत्ता

इथे आत्ता
रपरप पाऊस पडतोय
जमीन तृप्त होऊन वाहतेय
झाडं थेंबांशी खेळून थोडा वेळ
ओघळू देतायत त्यांना पानांवरून

पक्षी उडताय टुकटुक
इकडून तिकडे स्वैर
गळून पडलेल्या पानाफुलांना
वाटत नाहीय काहीच

माणसं कामाला लागालीयत आपापल्या
रस्ते वाहतायत..
अंग झटकून फिरायला लागलीयत कुत्री
वास येतायत भाज्यांचे वेगवेगळ्या
.....
काहीच तासांपूर्वी
या शतकातलं शेवटचं
सर्वात मोठं
खग्रास सूर्यग्रहण
लागलं... आणि संपलं.!

इतक्या दुर्मिळ,
विस्मयकारी खगोलीय घटनेची
कुणाला आठवणही राहिलेली नाहीय
एक विलोभनीय दृश्य
उमटलं आणि अंतर्धान पावलं..!

***

No comments:

Post a Comment