Saturday 16 January 2016

आता..

माझ्या कुंड्यांमधली सगळी रोपटी
मी उतरवून ठेवलीयत
त्या वृक्षाखाली
आता मी त्याना
पाणी घालत नाही
फक्त पाहते दुरून कधी कधी

तो वृक्षच त्याना ऊन देतो
फांद्यांतून ओघळणारं
आणि थोडी सावली हवी तेव्हा

पाऊसही उतरतो
त्यांच्यापर्यंत अधून मधून
वारा टाळत नाही त्याना
रोपटी कुठली म्हणून

जमीन तर असतेच तळाशी
गृहितासारखी पसरलेली
भोवती सोबत असते सहज
काहीच अपेक्षा नसलेली

आता जेव्हा जेव्हा
माझी सुनी बाल्कनी ओलांडून
वृक्षाच्याही पलीकडे
मी पाहते दूरवर...
तेव्हा सगळीच हिरवाई
मला आपली वाटते..!

***

No comments:

Post a Comment