Saturday 30 January 2016

माझं वय

आईनं सांगितलेल्या
माझ्या जन्मतारखेनुसार
माझं वय त्रेसष्ठ आहे.
पण त्यांना माझ्या आईचं सांगणं
मान्य नाही.
ते फक्त स्कूल लीव्हिंगचा कागद मानतात.
त्यानुसार माझं वय चौसष्ठ आहे.

एका वर्षानं काय फरक पडतो?
म्हणून त्यांच्यापुढे नमतं घेऊन
माझं वाढतं वय मी स्वीकारून टाकलं..
तर आता प्रत्येक डॉक्टर
माझं वेगवेगळं वय सांगताहेत.
तेही एकसंध नाही
एकजण फक्त हाडांचं वय सांगतो
दुसरा लिव्हरचं.. तिसरा फुफ्फुसांचं..
त्यांना स्कूल लीव्हिंगचा कागद मान्य नाही
ते यंत्राची स्पंदनं मानतात.

काल त्यांनी मला
जोरात फुंकर मारायला सांगितली.
मी मारली
अजून.. जास्तीत जास्त.. अशी- सर्व बळ एकवटून..
मी पुन्हा फुंकर मारली
त्यांनी स्क्रीनवर पाहिलं
एक.. दोन ..तीन वेळा काळजीपूर्वक तपासून
त्यांनी प्रिंटाउट काढला
त्यातली आकडेवारी समजावून सांगत
त्यांनी मला पटवून दिलं की
माझ्या फुफ्फुसांचं वय सत्त्याणौ आहे...
ताठ मानेनं आत गेलेली मी
वाकत थरथरत बाहेर पडले...

मनात आलं, असं कसं झालं?
आता तर नव्यानं तरूण झाल्याच्या आनंदात होते मी
माझे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले म्हणून
असं कसं अचानक वाढलं वय..?

अर्थपूर्ण शब्द शोधण्याच्या नादात
मी भरभरून श्वास घ्यायला
आणि मोकळेपणानं सोडायला
विसरत होते की काय?
इतक्या वर्षांच्या अवधीत
मला साधी फुंकर मारता येऊ नये?

तरी पूर्वसूरी बजावत होते
शब्द बापुडे केवळ वारा..!
तो मी भरभरून आत घ्यायला हवा होता
आणि निःसंगपणे सोडून द्यायला हवा होता..
‘..निज शैशवास जपणे..
मग जमलं असतं कदाचित..!
***   

No comments:

Post a Comment