Friday 29 January 2016

किती सहज

किती सहज वापरतो आपण शब्द
आपल्या भाषेतले !
झोपेतही
प्रतिक्षिप्तपणे घेतला जावा श्वास
तितक्या सहज !

तहानेनं व्याकूळ होऊन
बुडी मारत नाही
जगण्याच्या तळ्यात
शब्द वेचण्यासाठी

जिवाच्या आकांतानं
उत्खनन करत नाही
आस्तित्वांच्या ढिगार्‍यांचं
शब्द शोधण्यासाठी

किंवा तपश्चर्या करून
जिंकून घेत नाही
हवे ते शब्द
आकाशतत्त्वाकडून.

तयार भाषेतून
शब्द अलगद पडतात ओंजळीत
गळणार्‍या पानांसारखे
वाळलेले... निस्तेज...
किती सहज वापरतो आपण
असे आयते, स्वत: न कमावलेले
पिढ्यान् पिढ्यांचे उष्टे शब्द

आपले म्हणून! 
***

No comments:

Post a Comment