Wednesday 27 January 2016

काहिंच न करता ...

काहिंच न करता
बी सुद्धा न पेरता
माझ्या कुंडीत उगवतात
चवळीच्या शेंगा
जांभळ्या रंगाची अनाम फुलं
चित्र-विचित्र तुरे
मऊ-खरखरीत गवताची पाती
पानातून पान फुटत
वाढत जाणारी वेल...
मी आवर्जून लावलेल्या तुळशीभोवती
बघता बघता फोफावते
छोटेसे रान !...

मी माझ्या कुंडयांची
निगा राखत नाही
पेरत नाही हवं तेच, तेवढंच
उपटून टाकत नाही नको ते
खरं तर मला कळत नाही
मला काय हवंय.... काय नकोय
मला कळत नाहीत नावंही
अपसुक उगवून येणार्‍या वनस्पतींची
कळत नाही कसे काय काय उगवते
कुठून सुरवात होते या सगळ्याला...
मी असंख्य वेळा
अनुपस्थितच असते या सोहळ्यात
माझ्या परोक्षच
माझ्या कुंडीत
उगवत असते असे अनोळखी रान !

***

No comments:

Post a Comment